अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:12 AM2024-08-10T00:12:26+5:302024-08-10T00:14:37+5:30
ठाकरे दिल्लीतून परतल्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येणार
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे नुकतेच ३ दिवसीय दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतलेत तर दुसरीकडे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
येत्या १६,१७ आणि १८ ऑगस्टला अमित शाह राज्यात असतील. या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकी घेतील. प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची रणनीती यावेळी ठरवण्यात येईल.
महायुती, महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला सुरु आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली तर महाविकास आघाडीची समन्वय बैठकही झाली. महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा येत्या १६ ऑगस्टला होणार आहे तर महायुती २० ऑगस्टपासून प्रचाराचा नारळ फोडणार आहे.