राज ठाकरे यांचं अधून-मधून परिवर्तन, ज्या-त्या वेळच्या स्थितीनुसार ते मुक्तपणे मते मांडतात; शरद पवार यांचा प्रतिटोला
By दीपक शिंदे | Published: April 15, 2024 10:10 PM2024-04-15T22:10:51+5:302024-04-15T22:11:08+5:30
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मी महाराष्ट्रासाठी दहा वर्षात काय केले असे विचारतात, मात्र गेल्या दहा वर्षात त्यांचीच सत्ता होती. त्यामुळे त्यांनीच सांगावे त्यांनी काय केले? २००४ ते २०१४ या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर मी महाराष्ट्रासाठी काय केले हे मात्र निश्चित सांगू शकतो, असे आव्हान शरद पवार यांनी दिले.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे सांगत पवार म्हणाले, 'मी तसं बोललो नव्हतो. अजित पवार यांनी भाषणात सुप्रियाताईंना निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या, पुढे त्यांनी काही वाक्यं वापरली. त्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं. त्यापेक्षा वेगळं काही मला सांगण्याचे कारण नव्हतं. देशात महिला आरक्षणासंदर्भात निर्णय पहिला मुख्यमंत्री मी हाेतो. तसेच शासकीय सेवेत महिलांना विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री असताना तिन्ही दलात मुलींना सहभागी करून घेण्याचा निर्णय मी घेतला. महिलांना सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी निर्णय आम्ही घेतले, असेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले.
व्हीव्हीपॅट बाबत मला जास्त तांत्रिक माहिती नाही. परंतु, काही लोकांनी याबाबत प्रेझेंटेशन दिले. त्यावरून शंका घेण्यास जागा असल्याचे दिसत असल्याचे पवार यांनी सांगितले. शिवतारेंना उभे राहण्यासाठी आपल्याकडूनच फोन येत होते, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. याबाबत छेडले असता पवार म्हणाले, एखादा उमेदवार उभा राहणे आम्हाला फायद्याचे असेल तर अन् त्याला प्रेमाने सांगितलं तर काय चुकलं, असा मिश्किल सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांचं अधून-मधून परिवर्तन
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबाबत शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन अधून-मधून होत असते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता ज्या-त्या वेळच्या स्थितीनुसार ते मुक्तपणे मते मांडत असतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.