अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:28 IST2025-02-22T11:27:08+5:302025-02-22T11:28:07+5:30

महायुतीतील तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Amit Shah to visit Pune today Will he resolve the dispute over the guardian ministership of two districts | अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

BJP Amit Shah: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरात दाखल झाले आहेत. शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम विभागीय बैठक होणार असून इतरही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील महायुती सरकारमध्ये निर्माण झालेल्या काही तिढ्यांबाबत अमित शाह यांच्याकडून मध्यस्थी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेला संघर्ष निवळावा, यासाठी अमित शाह हे महायुतीतील घटकपक्षांना पर्याय सुचवतील, असं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्‍यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या घटनेला महिनाभराचा कालवधी उलटून गेल्यानंतरही अद्याप या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांच्याविरोधात भरत गोगावले यांनी तर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या दादा भुसे यांनी मोर्चेबांधणी केली आहे. या तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव या राज्याचे व्हीआयपीदेखील पुणे हजर राहणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले. वानवडी वाहतूक विभागांतर्गत पाण्याची टाकी सर्कल ते टर्फ क्लब रोडदरम्यान दुतर्फा वाहतूक शनिवारी सुरू राहणार आहे.

बाणेर रोडवरील वाहतूक अशाप्रकारे वळवली जाणार
 
१) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.
२) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.
३) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.

Web Title: Amit Shah to visit Pune today Will he resolve the dispute over the guardian ministership of two districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.