उदयनराजेप्रकरणी अमित शहांनी कुणाला फोन केला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:36 AM2017-07-28T04:36:23+5:302017-07-28T04:36:35+5:30
उदयनराजे गुन्ह्याप्रकरणी भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या रामराजेंवर टीका केल्यानंतर थेट अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी भाजपवर पलटवार केला आहे
सातारा : उदयनराजे गुन्ह्याप्रकरणी भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या रामराजेंवर टीका केल्यानंतर थेट अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
‘उदयनराजेंच्या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शहांचा फोन कोणाला गेला होता. सोना अलाईज कंपनीच्या मालकाचा अमित शहांशी काय संबंध, शहांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून काय सांगितले? त्यानंतर मुख्यंत्र्यांनी कोणाला फोन केला, याची माहिती येळगावकरांनी पहिली घ्यावी.
आधी स्वत:च्या पक्षात काय चालले आहे ते पाहा; मग राष्ट्रवादीवर बोला,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिला आहे.
उदयनराजेंना खंडणीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीनेच अडकविल्याचा आरोप भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी केला होता.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले या साखळीने उदयनराजेंना अडकविल्याचे येळगावकरांनी म्हटले होते.