अमित शहांना ‘क्लीन चिट’
By admin | Published: May 7, 2014 10:59 PM2014-05-07T22:59:55+5:302014-05-07T22:59:55+5:30
गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा कोणताही पुरावा नाही, अशी भूमिका केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) घेतली आहे.
इशरत जहाँ चकमक : सीबीआयकडे आरोपी करण्याएवढा पुरावा नाही
अहमदाबाद/ नवी दिल्ली: इशरत जहाँ या मुंब्रा येथील तरुणीस गुजरात पोलिसांनी १० वर्षांपूर्वी ‘दहशतवादी’ म्हणून बनावट चकमकीत ठार केल्याशी संबंधित प्रकरणात त्यावेळचे गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा कोणताही पुरावा नाही, अशी भूमिका केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) घेतली आहे. अमित शहा सध्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे विश्वासू म्हणून सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराची खास करून उत्तर प्रदेशात धुरा सांभाळत आहेत. अमित शहा व गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा पुरावा आम्ही केलेल्या तपासात मिळालेला नाही, असे लेखी निवेदन सीबीआयने इशरत जहाँ प्रकरणाची सुनावणी करणार्या अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात बुधवारी सादर केले, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. अमित शहा यांना आरोपी केले जावे, असा अर्ज गोपीनाथ पिल्लई यांनी दोन महिन्यांपूर्वी न्यायालयात केला होता. त्यास सीबीआयने वरीलप्रमाणे उत्तर सादर केले आहे. इशरत जहाँसह जे चारजण या बनावट चकमकीत ठार झाले होते त्यांत पिल्लई यांचा मुलगा प्रणेश ऊर्फ जावेद शेख याचाही समावेश होता. सीबीआयने या प्रकरणी गुजरातचे निलंबित अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा व जी.एल सिंघल आणि इन्टेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) चार अधिकार्यांसह एकूण ११ जणांविरुद्ध याआधीच आरोपपत्र सादर केले आहे. सीबीआयच्या या उत्तरावर पिल्लई यांना युक्तिवाद करायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाने त्यांना ९ मे ही तारीख दिली आहे. अर्थात सीबीआयचे हे म्हणणे मान्य करून अमित शहा यांच्याविरुद्धचे प्रकरण बंद करायचे की नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. दिल्लीच्या आरुषी खून खटल्यातही सीबीआयने आरुषीच्या आई-वडिलांना अशीच ‘क्लीन चिट’ दिली होती. पण गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने त्यांना आरोपी करण्याचा आदेश दिला व त्यातूनच पुढे त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. असे असले तरी अमित शहा यांना सीबीआयच्या या पवित्र्यामुळे सध्या तरी दिलासा मिळाला आहे. त्याच सुमारास झालेल्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात अमित शहा आरोपी आहेत. त्यात २०१० मध्ये सीबीआयने त्यांना अटकही केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तपासात समोर आलेल्या अमित शहा यांच्या विरोधातील पुराव्यांकडे सीबीआयने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे, असा पिल्लई यांचा आरोप आहे. ४या संदर्भात त्यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या काही पोलीस अधिकार्यांच्या फोनवरील संभाषणाचे रेकॉर्ड व काही आरोपींनी सीबीआयला दिलेल्या जाबजबांचा संदर्भ दिला आहे. ४दंडाधिकार्यांसमक्ष नोंदविलेल्या या जबाबांमध्ये काही पोलीस अधिकार्यांनी असे सांगितले होते की, ही बनावट चकमक अमित शहा व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संमतीनेच ठरविली गेली असल्याचे इतर अधिकारी फोनवरून सांगत असताना आम्ही ऐकले होते; मात्र ही केवळ ऐकीव माहिती आहे, सबळ पुरावा नाही, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात मोदी व अमित शहा ‘संभाव्य आरोपी’ आहेत व त्यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा पुरावा आहे, असे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल वारंवार सांगत आले आहेत. ४विशेषत: मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्यापासून सिब्बल यांनी हा हल्ला अधिक तीव्रतेने चढविला आहे. पण आता सीबीआयने त्यांनाच तोंडघशी पाडले आहे.