अमित शहांना महाराष्ट्र प्रभारींसाठी आग्रह
By admin | Published: May 18, 2014 11:40 AM2014-05-18T11:40:08+5:302014-05-18T11:40:08+5:30
गुजरातमधून लोकसभेच्या सर्व जागा भाजपाला एकहाती मिळवून देणार्या अमित शहा यांना भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी बनविण्यासाठी राज्यातील भाजपा नेते उत्सुक आहेत.
राजेश निस्ताने
गुजरातमधून लोकसभेच्या सर्व जागा भाजपाला एकहाती मिळवून देणार्या अमित शहा यांना भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी बनविण्यासाठी राज्यातील भाजपा नेते उत्सुक आहेत. नरेंद्र मोदी लाटेमुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही जागा वाढल्या आहेत. हेच वातावरण कायम राहिल्यास राज्यातही युतीचे सत्ता येणे कठीण नाही, याची जाणीव भाजपा नेत्यांंना झाली आहे. म्हणूनच की काय त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. राजीव प्रताप रुढी हे सध्या महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी आहेत. मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन गुजरातचे गृहमंत्री तथा नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांच्याकडे दिली जावी, असा भाजपातील वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे. नरेंद्र मोदींची लाट निर्माण करणे, लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे नियोजन करणे यासह मोदींच्या अनुपस्थितीत गुजरातची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या अमित शहांच्या भरघोस कामगिरीने महाराष्ट्रातील भाजपा नेते चांगलेच प्रभावित झाले आहेत. शहांकडे महाराष्टÑ भाजपाची सूत्रे दिल्यास विधानसभेतही यश मिळविता येऊ शकते, भाजपाच्या जागा वाढवून मुख्यमंत्रीपदही मिळविता येऊ शकते, असा विश्वास या नेत्यांना वाटू लागला आहे. मात्र त्यासाठी त्यांना अमित शहांचे नेतृत्व हवे आहे. भाजपाच्या गोटातून अमित शहांसाठी आतापासूनच जोर लावला जात आहे. अमित शहा यांनी गुजरातमधील सर्व २६ जागांवर भाजपाचे खासदार निवडून आणले आहेत. मोदींच्या प्रचार प्रसाराची पडद्यामागील सर्व सूत्रे त्यांच्याकडे होती. मोदींच्या दिल्लीकडे निघालेल्या रथाचे सारथी शहा होते. राज्यात निवडून आलेल्या युतीच्या वरिष्ठ खासदारांमध्ये एकीकडे मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असताना भाजपाचे स्थानिक नेते मात्र विधानसभेच्या व्युहरचनेच्या तयारीला लागले आहेत.