मोठी बातमी : अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 09:42 AM2022-02-27T09:42:55+5:302022-02-27T09:44:23+5:30
Amit Thackeray News: गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रीय असलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहुर्त साधून मनसेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनसेने अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी केली आहे.
मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रीय असलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहुर्त साधून मनसेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनसेने अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी केली आहे.
आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा केली आहे. आज मराठी भाषा गौरव दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.
राज ठाकरे यांचे सुपुत्र हे गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये बऱ्यापैकी सक्रिय होते. मात्र त्यांच्याकडे पक्षाने कुठलेही पद किंवा जबाबदारी सोपवली नव्हती. ते मनसेच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच दौऱ्यावर जात असत. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.