अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:19 AM2022-07-14T11:19:04+5:302022-07-14T11:19:56+5:30
बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई - राज्यातील राजकारणात शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार असं म्हणत शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी मविआ सरकारविरोधात भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.
आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची ऑफर भाजपानं दिल्याची बातमी समोर आली. एका इंग्रजी दैनिकाने ही बातमी छापल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत आहेत अशा शब्दात त्यांनी वृत्ताचं खंडन ABP माझाला केला आहे. राज्यात सत्तांतर घडत असताना मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते. तेव्हापासून मनसे राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होईल अशी चर्चा सुरू झाली. मनसेला २ मंत्री पदे दिली जातील असे बोलले गेले. परंतु त्यावर मनसेने कुठलेही भाष्य केले नाही. मात्र आता अमित ठाकरेंचे नाव पुढे आल्यानंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा सुरू होती. बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता अमित ठाकरेंच्या चर्चेबाबत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केले आहे. शिंदे गटासोबत केवळ आमदारच नाही तर काही खासदार, नगरसेवकही आता सहभागी होत आहेत. मुंबईतही शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला. म्हात्रे यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.