आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:56 PM2019-07-09T17:56:15+5:302019-07-09T17:56:15+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली.

Amit Thakarey, following Aditya in Mumbai, is active on local issues | आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय

आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय

Next

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनावर जोर देण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या युवक आघाड्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा बीचवर सफाई मोहीम आखली होती. आता, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे स्थानिक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहे.

भाजप-शिवसेना युती अंतिम झाली असून विरोधकांची मात्र अद्याप चर्चाच सुरू आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्यातील या घडामोडीमुळे विधानसभा निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांना सोबत घेण्यास राज्यातील नेत्यांनी असमर्थता दर्शविली होती. परंतु, राज यांच्या दिल्ली वारीने राज्यात नवीन समिकरणे उदयास येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेची युवक आघाडी सक्रिय होताना दिसत असून याचा पक्ष संघटनेला फायदाच होणार आहे.

गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा बीच साफ केल्यानंतर लगेचच अफरोज शाह यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी आदित्य यांच्यासोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते होते. आदित्य ठाकरे पर्यावरण आणि स्वच्छेतवर काम करत आहे. त्यांच्याच आग्रहामुळे राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सक्रीय होऊन शिवसैनिकांशी संवाद साधला होता. आता आदित्य ठाकरे राज्यभर जनआशिर्वाद दौरा काढणार असल्याचे समजते. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

आदित्य यांचा कित्ता गिरवत आमित ठाकरे देखील स्थानिक प्रश्नांवर काम करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकूण अमित ठाकरे यांनी अक्षरश: डोकं टेकवले होते. या भेटीत आमित यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच रेल्वे अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला.

दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागामुळे ठाकरे घरण्यातील तिसरी पिढी जनतेत मिसळून काम करताना दिसत आहेत. याचा त्यांच्या पक्षांना किती फायदा होतो हे येणारा काळच सांगणार आहे.

 

Web Title: Amit Thakarey, following Aditya in Mumbai, is active on local issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.