पान मसाल्याची जाहिरात का केली? अमिताभ बच्चन यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:26 PM2021-09-17T17:26:30+5:302021-09-17T17:31:21+5:30
Amitabh Bachchan Pan Masala Advertise: अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.
नवी दिल्ली: आजकाल बॉलिवूडचे सुपरस्टार कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींमध्ये काम करतात. काही जाहिरातींमुळे त्या अभिनेत्याची प्रशंसा होते, तर काही जाहिरातीमुळे टीका होते. अशाच एका जाहिरातीमुळे महानायक अमिताभ बच्चन यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
तुम्ही टीव्हीवर अनेकदा पान मसाल्याची जाहिरात पाहिली असेल. सुरुवातीच्या काळात फक्त अजय देवगण पान मसाल्याची जाहिरात करायचा. पण, आता शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग आणि अमिताभ बच्चनसारखे अभिनेतेही पान मसाल्याची जाहिरात करत आहेत. ही जाहिरात केल्यामुळेच महानायक अमिताभ बच्चन यांना ट्रोलचा सामना करावा लागला.
अमिताभ यांनी केली 'कमला पसंद'ची जाहिरात
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचा बॉलिबूडमधील कलाकारांसह इतरही लोक खूप सन्मान करतात. पण, आता आपल्या लाडक्या महानायकाला पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहून चाहत्यांचा पारा चांगलाच चढला. अमिताभ यांना पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहून त्यांचे चाहतेच त्यांच्याविरोधात झाले आणि त्यांना ट्रोन करणे सुरू केले. हे ट्रोल वाढल्यानंतर स्वतः अमिताभ यांना समोर येऊन ही जाहिरात करण्याचे कारण सांगावे लागले.
अमिताभ यांनी दिलं स्पष्टीकरण
या जाहिरातीमुळे ट्रोल झाल्यानंतर अमिताभ बच्चन समोर येऊन म्हणाले, 'महोदय, मी माफी मागतो. पण, एखाद्या व्यवसायात कुणाचं चांगलं होत असेल, तर आपण त्याच्यासोबत का जायचं, असा विचार करू नये. त्याच्या व्यवसायातून स्वतःचाही फायदा पाहायला हवा. ही जाहिरात केल्यामुळे मला पैसे मिळाले, हा माझाही फायदाच आहे. पण, माझ्यासह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लोकांनाही काम मिळालं आणि त्यातून त्यांनाही पैसा मिळाला. चुकीच्या शब्दांचा वापर करू नका, हे तुम्हाला शोभत नाही', असे स्पष्टीकरण अमिताभ यांनी दिलं.