वनमंत्र्यांचे अमिताभ बच्चन यांना निमंत्रण
By admin | Published: July 24, 2016 03:32 AM2016-07-24T03:32:03+5:302016-07-24T03:32:03+5:30
वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांची भेट घेऊन व्याघ्र संरक्षण व संवर्धन कार्यक्रमाची माहिती देत ११ ते १३ नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे होणाऱ्या
मुंबई : वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांची भेट घेऊन व्याघ्र संरक्षण व संवर्धन कार्यक्रमाची माहिती देत ११ ते १३ नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे होणाऱ्या ताडोबा महोत्सवाचे निमंत्रण दिले. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने यशस्वीपणे राबविलेल्या २ कोटी वृक्ष लागवडीच्या महामोहिमेचे बच्चन यांनी भरभरून कौतुक केले.
व्याघ्र व वन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागातील क्षेत्रीय पातळीवरील वनरक्षकासारख्या शेवटच्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे व त्यांना आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात, अशी अपेक्षा बच्चन यांनी व्यक्त केली. वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तसेच ग्रीन आर्मीच्या प्रचारासाठी बच्चन यांनी महत्त्वाच्या शहरांत भेटी देण्याची संकल्पनाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मांडली.
या संकल्पनेस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी प्रवीण परदेशी, विकास खारगे व बिट्टू सहगल यांची उपस्थिती होती.
दोन कोटी वृक्ष लागवडीचे पुढचे पाऊल म्हणून महाराष्ट्र आता पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यासाठी ३३ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यात रूट ट्रेनर तंत्रज्ञान वापरणे, रिअल टाईम रिपोर्टींग, गाव निहाय नर्सरी करणे, लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मिती करणे आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)