घरोघरी हवेत अमिताभ, शाहरुख!
By Admin | Published: April 15, 2015 12:55 AM2015-04-15T00:55:46+5:302015-04-15T00:55:46+5:30
चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअॅलिटी शो’मध्ये झळकावे,
पुणे : चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअॅलिटी शो’मध्ये झळकावे, असे वाटत असते. त्यामुळे सुट्टीचा मोसम सुरू झाल्याबरोबर मुलांना अभिनय आणि नृत्य शिबिरांना पाठविण्यात सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे.
एक काळ असा होता की शाळांना ‘उन्हाळी’ सुट्या लागल्या की, मुले ‘मामाच्या गावाला जायची’ किंवा मैदानी अथवा कॅरम, पत्ते यासारख्या बैठ्या खेळांमध्ये गुंतायची. मात्र, आता सुट्टीच्या काळातही मुलाने काहीतरी शिकावे, या कल्पनेने पालक सुट्टीच्या आधीपासून विचारात गढलेले असतात.
उन्हाळी शिबिरांची संख्या वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या अशा शिबिरांना पाठविण्याचा ओढा वाढला आहे. त्यातही आता चित्रपट आणि जाहिरातींमध्ये साततत्याने झळकणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यांमुळे आणि नृत्यविषयक ‘रिअॅलिटी शो’मुळे ‘अभिनय आणि नृत्य’ शिबिरांना पालकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली असून, ही शिबिरे जवळपास ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय-नाट्य शिबिरे तसेच कार्यशाळांचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. शिबिरांच्या चौकशीसाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या चक्रव्यूहात पालकांची मानसिकता गुरफटत चालल्याचे हे काही अंशी द्योतक मानता येईल.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले याबाबत म्हणाल्या, ‘कला’ ही अंगभूत असावी लागते, ती प्रत्येकातच असते. केवळ गरज असते ती त्या कलेला वाव देण्याची. त्यादृष्टीने ही शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण आपल्या मुलाचा कल कुठे आहे, हे पाहूनच त्याला योग्य त्या शिबिरात घालणे आवश्यक आहे. आपल्याला वाटते म्हणून पालकांनी मुलांना विशिष्ट शिबिरांना पाठविणे चुकीचे आहे. नेमके सध्या हेच होत आहे. शिबिरे हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग असतो. ७ किंवा १० दिवसांत कोणताही मुलगा अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकत नाही. तरीही या शिबिराद्वारे आपली मुले जाहिरातीत झळकतील किंवा चित्रपटांत दिसतील हा पालकांचा समजच योग्य नाही. मुलांमधील कलागुण विकसित व्हावेत, आत्मविश्वास वाढावा, संवादकौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश असायला हवा. (प्रतिनिधी)
४मुलांचा कल नक्की कशात आहे हे पाहून मुलांना अशा शिबिरांना पाठविले जावे. आपल्या मुलांना व्यावसायिक संधी तातडीने मिळावी अशी पालकांची अपेक्षा असते. पण अशी उन्हाळी शिबिरे ही अभिनयाची ओळख करून देण्यापुरती असतात. मुलांना खरच या क्षेत्रात पाठवायचे असेल तर पालक आणि मुले दोघांनाही संघर्ष करावा लागतो. मुलांना विविध ठिकाणी आॅडिशन्सला न्यावे लागते, मुलांमध्ये क्षमता असेल तर नक्कीच संधी मिळते, पण त्यासाठी संयमाची आवश्यकता असल्याचे अभिनेत्री आणि अभिनय अॅकॅडमी संचालक मधुराणी प्रभुलकर हिने स्पष्ट केले.
रिअॅलिटी शोची जणू जत्राच भरलीय
मराठी चित्रपटसृष्टीत लहान मुलांशी संबंधित चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. जाहिरातींमध्येही मुले चमकत आहेत, विविध वृत्तवाहिन्यांवर नृत्याशी निगडित ‘रिअॅलिटी शो’ची जत्राच भरल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टी कमीतकमी वेळेत झटपट प्रसिद्धी देणाऱ्या असल्यामुळे पालकांचा कल अशा शिबिरांकडे वाढत असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.