जन्मदात्यांच्या शोधार्थ अमितची भटकंती

By admin | Published: January 2, 2017 11:04 PM2017-01-02T23:04:51+5:302017-01-02T23:04:51+5:30

‘तू आमचा खरा मुलगा नसून, वंशाला दिवा असावा म्हणून आम्ही तुला विकत घेतले आहे’

Amit's wandering for the search of the biographers | जन्मदात्यांच्या शोधार्थ अमितची भटकंती

जन्मदात्यांच्या शोधार्थ अमितची भटकंती

Next

ऑनलाइन लोकमत/ बाळासाहेब काकडे

अहमदनगर, दि. 2 - ‘तू आमचा खरा मुलगा नसून, वंशाला दिवा असावा म्हणून आम्ही तुला विकत घेतले आहे’, हे आईच्या तोंडचे बोल ऐकून अमित पांडुरंग नरुटे या तरुणाला धक्काच बसला आणि त्याने सुरू केला शोध खऱ्या आई-वडिलांचा़ त्याचा हा शोध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बारामतीतून सुरू झालेला खऱ्या आई-वडिलांचा शोध त्याला श्रीगोंदा शहरापर्यंत घेऊन आला़ मात्र, त्याला अद्याप त्याचे खरे आई-वडील कोण याचा सुगावा लागला नाही.

अमित पांडुरंग नरूटे हा काझड (ता़ इंदापूर) येथील रहिवासी़ असून, तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे़ बारामती येथील भारत फोर्ज कंपनीत तो अभियंता म्हणून काम करीत आहे़ अलका व पांडुरंग नरुटे (रा़ काझड) या दाम्पत्याने अमितला लहानाचे मोठे केले़ आपलीच ओळख त्याला दिली़ एव्हढेच नव्हे, तर अलका नरुटे यांचाच तो मुलगा असल्याची नोंदही बारामती येथील रमाबाई मोकाशी हॉस्पिटलमध्ये आहे़ मात्र, याच अलका नरुटे यांनी एके दिवशी अमितला ‘तू आमचा मुलगा नाहीस, तुला आम्ही वंशाला दिवा हवा म्हणून विकत घेतले आहे, असे सुनावले़ त्यामुळे अमितला मोठा धक्का बसला़ मग त्याने सुरू केला शोध खऱ्या आई-वडिलांचा.

२९ मे १९९१ साली बारामती येथील रमाबाई मोकाशी हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या अमितने खरे आई-वडील शोधण्यासाठी याच हॉस्पिटलकडून माहिती अधिकारात माहिती मागविली़ या माहितीनुसार २९ मे रोजी अलका नरुटे यांची प्रसूती होऊन त्यांना मुलगा झाल्याची नोंद आहे़ मात्र, त्याचदरम्यान या हॉस्पिटलमध्ये रंजना निगडे (रा़ बामजेवाडी), सुरेखा चव्हाण (रा़ पवारवाडी), मीरा संजय खोमणे (रा़ श्रीगोंदा), उषा शंकर निगूल, नलिनी सुभाष सावंत, आशा अंकुश खोमणे (रा़ फलटण रोड), मंदा जगताप (रा़ मुंबई), शारदा प्रभाकर गुजले (रा़ खांडज), सविता धनंजय खलाटे (रा़ शिरसणे), रेहना सल्लाउद्दिन इनामदार (रा़ कारखेल, ता़ बारामती) या मातांनीही बाळांना जन्म दिल्याची नोंद आहे़ त्यामुळे अमित या मातांना शोधत फिरत आहे़ कंपनीतील नोकरी करून सुटीच्या काळात तो खऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. 

अमित हा शाळेत अतिशय हुशार होता़ तो नरुटे परिवारात लहानाचा मोठा झाला. पण लहानपणापासून त्याला परिवारात दुय्यम वागणूक मिळत होती़ एकदा आईने त्याला सांगितले की, ‘तू आमचा नसून, तुला आम्ही विकत घेतले आहे़’ याचा अमितवर मोठा परिणाम झाला़ त्यानंतर त्याने खऱ्या आई-वडिलांचा शोध सुरू केला़ मात्र, अद्याप त्याला खऱ्या आई-वडिलांचा शोध लागला नाही़ त्याचा शोध सुरूच असून, अमितला खरे आई-वडील मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे.

मी खऱ्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी दोन वर्षांपासून फिरत आहे़ ज्या दिवशी खरे आई-वडील सापडतील, तो दिवस माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा असेल़ माझी कुणावरही अन्याय करण्याची भावना नाही़ परंतु मला खऱ्या आई-वडिलांचे प्रेम मिळावे, अशी मनोमन इच्छा आहे़ त्यासाठी मी डीएनए चाचणी करून घेण्यास तयार आहे़
-अमित नरुटे, काझड (ता. इंदापूर, जि. पुणे)
 

Web Title: Amit's wandering for the search of the biographers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.