दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील! खडसेंनी फेटाळला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:27 PM2017-09-06T13:27:52+5:302017-09-06T16:30:22+5:30

भाजपाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अंजली दमानियांबद्दल आपण कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही,

Ammons in the field of Damania will be small! Khadseeni denied the charges | दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील! खडसेंनी फेटाळला आरोप

दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील! खडसेंनी फेटाळला आरोप

Next

जळगाव, दि. 6 - भाजपाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अंजली दमानियांबद्दल आपण कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही,  आपण काहीही बोललो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दमानिया यांनी खडसे यांच्याविरुध्द बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

२ सप्टेंबर रोजी खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, राजेंद्र फडके आदींची मुख्य उपस्थिती होती. या जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले होते की, माझ्या शेतातील उत्पन्नाबाबत काही वेळेस प्रश्न उपस्थित होतात. परंतु मला सांगायचे आहे की, माझ्या शेतातील आंबे आता मोठे झाले आहेत. कदाचित दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील... 

या वाक्याबाबत अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला असून यावर खडसे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, मी काहीही असभ्य बोललो नाही. अंजली दमानियांचे नावही घेतलेले नाही. दमानिया म्हणजे दुसरी पुरुष व्यक्तीही असू शकते. मात्र अंजली दमानिया यांनी अंगावर घेण्याचे काहीही कारण नाही.
खडसे पुढे म्हणाले की, लोकांमध्ये आता असे बोलले जात आहे की, खडसेंचा काहीही विषय असो अंजली दमानिया या नेहमीच त्याचा गाजवाजा करतात. राज्यात अनेक मोठे मोठे विषय गाजले व गाजत आहेत. मात्र त्याबद्दल त्या कधीही बोलत नाही. सुभाष देसाई, प्रकाश मेहता यांच्यासह शालेय पोषण अशी अनेक गंभीर प्रकरणे पुढे आली मात्र याबद्दल अंजली दमानिया काहीही बोलल्या नाही. खडसेंचेच विषय त्या नेहमी पुढे करतात. यामागील कारण काय?

एकनाथ खडसेंचे अंजली दमानियांच्या आरोपांना उत्तर 
- अजित पवार, सुनिल तटकरे यांच्याविरोधात तक्रारी मागे का घेतल्या ? - एकनाथ खडसेंचा अंजली दमानियांना सवाल. 
- आरोप करुन माघार घेण्याच कारण काय ? 
- दाऊदशी माझ्या संबंधांचा आरोप खोटा निघाला
- भोसरीची जमीन मी नाही माझ्या जावयाने घेतली.
- माझी जमीन 100 टक्के बागायती जमीन. 
- माझ शेतीशिवाय कशातूनही उत्पन्न नाही. 
- फक्त मलाच का टार्गेट केले जातेय. 
- अंजली दमानियांबरोबर माझी भेट झालेली नाही. 
- विरोधी पक्षात असताना मी त्यांना भेटलो होतो. 
- कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. 
- आयुष्यात कधीही महिलेचा अनादर केला नाही. 
- माझी कोणतीही खासगी कंपनी किंवा संस्था सुद्धा नाही. 

खडसेंना सोडणार नाही - अंजली दमानिया 
एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली त्यामुळे मी प्रचंड व्यथित झाले आहे. खडसेंविरोधात मी तिस-यांदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, मी थेट कोर्टात जाईन असे दमानिया यांनी म्हटले आहे. आज मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याशीही चर्चा करणार आहे. यावेळी खडसेंना आपण सोडणार नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे. 

खडसे यांचा राजीनामा
मागच्यावर्षी एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर होत आहे, असे खडसे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी लागलीच खडसे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगत त्यांच्यावरील सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे टि्वटरवरुन जाहीर केले होते. 
 

राजीनाम्याची ७ कारणे...
- खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक.
- भोसरी; पुणे येथील एमआयडीसीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड पत्नीच्या नावे खरेदी केला. व्हीसल ब्लोअर हेमंत गवंडे यांनी पुराव्यासह केलेला आरोप आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार
- अंजली दमानिया यांनी कुऱ्हा-बडोदा उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी आज़ाद मैदानावर आरंभिलेले उपोषण
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून खडसेंच्या मोबाइलवर झालेले कथित कॉल्सचे प्रकरण हॅकर मनिष भंगाळे याने बाहेर काढले.
- खडसे यांच्या कार्यालयातील 
वादग्रस्त अधिकारी वर्ग 
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अधूनमधून उडणारे खटके 
- पत्नीला महानंदचे संचालकपद, मुलीकडे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सूनबाई खासदार. पक्षश्रेष्ठींना ही घराणेशाही खटकली. 

Web Title: Ammons in the field of Damania will be small! Khadseeni denied the charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.