चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:28 AM2024-10-21T10:28:46+5:302024-10-21T10:29:15+5:30
Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे.
बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली. स्थानिक असलेले अमोल बालवडकर यांनी आपल्याला उमेदवारी न मिळल्यास बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. रविवारी सकाळीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या निवासस्थानी जात त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही यादीची वाट पाहू, असे वक्तव्य बालवडकर यांनी करत नाराजी कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
रविवारी दुपारी भाजपाची पहिली यादी आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांचे नाव आहे. यामुळे बालवडकर बंडखोरीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावनकुळेंच्या भेटीनंतरही बालवडकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. बालवडकर यांनी बंडखोरी केल्यास चंद्रकांत पाटलांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
कोथरुडमध्ये पोटनिवडणुकीपासून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात येत आहे. पाटील हे मुळचे कोल्हापुरचे आहेत. यामुळे कोथरुडकरांवर बाहेरील उमेदवार लादला जात असल्याने स्थानिक नेत्यांना संधी मिळत नसल्याची नाराजी भाजपात आहे. दोन्ही वेळच्या उमेदवारीवेळी हा वाद उफाळून आला होता. यंदा बालवडकर यांनी उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून मागणी केली होती. तरीही स्थानिक असलेल्या बालवडकर यांना भाजपाने डावलून पुन्हा चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे. कोथरुड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. बालवडकर हे तळागाळातून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची पत्नी पुणे महापालिकेची नगरसेविका आहे. यामुळे जर बालवडकरांनी बंडखोरी केली तर कोथरुडकर कोणाला साथ देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघ आणि पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाले होते. या वादात भाजपने अगोदरच्या आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी दिली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभेतून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभेतून सिद्धार्थ शिरोळे यांना लढण्याची संधी दिली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी बालवडकर यांच्या संभाव्य बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. बालवडकर पक्षाला डॅमेज करणारी भूमिका घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.