Amol Mitkari: सत्ता गेल्यानं काम-धंदा उरला नाही; शरद पवारांवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:10 PM2022-04-14T17:10:13+5:302022-04-14T17:23:51+5:30
Amol Mitkari: "मोहन भागवतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा फोटो दाखवावा."
मुंबई: आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे. देशभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण, यादरम्यान भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या त्या 14 ट्विट्सना प्रत्युत्तर दिले आहे.
'तुम्ही मुस्लीम द्वेष्टे आहात'
अमोल मिटकरी यांनी चार ट्विट्समधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "सत्तेत नसल्याने व काही काम धंदा उरला नसल्यामुळे विरोधी पक्षनेत्याने 14 एप्रिलचे निमित्त साधून जे 14 ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले, त्यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष दिसून येतो. मुस्लीम द्वेष्टे आहात तर शहानवाज हुसेन व मुक्तार अब्बास नकवी यांच्याबद्दल बोला", अशी टीका मिटकरी यांनी केली.
'मोहन भागवत यांचा फोटो शेअर करावा'
तसेच, "देवेंद्र फडणवीस आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे जे सोंग केले ते वरवरुन आहे का? एकीकडे संविधान व जयभिम म्हणायचे आणि आतून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याचे षडयंत्र रचायचे? हेच आयुष्यभर करणार आहात का? बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली हे वास्तव देवेंद्रजी फडणवीस स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांनी मनुस्मृतीचा निषेध करण्याचे धाडस दाखवावे," असे आव्हानही त्यांनी केले. याशिवाय, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा फोटो देवेंद्रजी फडणवीस किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या कुठल्याही नेत्याने ट्विट करावा," अशी विनंतीही केली.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन भाजप काळात झालेल्या विविध कामांची माहिती दिली आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. त्यात ते म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्याचे हक्काचे असलेले वैधानिक विकास मंडळं महाविकास सरकारने बंद करून टाकले, सार्या योजना बंद करुन टाकल्या. आता तर भारनियमन सुरू केले. जो शब्द महाराष्ट्राच्या विस्मरणात गेला होता, तो पुन्हा लादल्या गेला. आत्मकेंद्रीत ऐवजी समाजकेंद्रीत पिढी घडविणे हे काम महत्त्वाचे आहे. आमच्या सरकारच्या काळात सुमारे 200 कोटींचे बिनव्याजी कर्ज महिला बचत गटांना दिले. महिला कधीच कर्ज बुडवित नाही, हाच अनुभव आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून मोठी क्रांती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडविली आहे. आता त्यात डिजिटल विद्यापीठाची भर पडते आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वयात शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे.
'इंदूमिल स्मारकासाठी नरेंद्र मोदींनी 2300 कोटींची जागा दिली'
केवळ आर्थिक संसाधनाच्या बळावर देश प्रगती करू शकत नाही, तर त्यासाठी कुशल मानवसंसाधन हे सुद्धा आवश्यक आहे. 6 जिल्ह्यांत असे उत्तम मनुष्यबळ घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमांतून होते आहे. पण, या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले. ऊस कोणत्या शेतकर्याचा आहे, हे पाहून त्याला न्याय/अन्याय ठरविला जातो. आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा योग मला आला, हे माझे भाग्य आहे. नागपुरात महापौर म्हणून दीक्षाभूमीची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मुख्यमंत्री झाल्यावर इंदूमिल स्मारकाची पायाभरणी करता आली. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण, एक इंच जागा त्यांनी या स्मारकासाठी दिली नाही. इंदूमिल स्मारकासाठी आम्ही नरेंद्र मोदींकडे गेलो. त्यांनी तीन दिवसांत 2300 कोटींची जागा एका झटक्यात दिली.