अमोल मिटकरींना महायुतीतील नेत्यांवरही संशय?; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:48 PM2024-03-24T21:48:34+5:302024-03-24T21:51:03+5:30

विजय शिवतारे यांच्याकडून अजित पवार यांच्यावर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला जात आहे. शिवतारे यांच्या या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amol Mitkari doubts the leaders of the Grand Alliance over vijay shivtare Candidacy | अमोल मिटकरींना महायुतीतील नेत्यांवरही संशय?; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले...

अमोल मिटकरींना महायुतीतील नेत्यांवरही संशय?; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले...

Amol Mitkari ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमदेवारीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विजय शिवतारे यांच्याकडून अजित पवारांवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला जात आहे. शिवतारे यांच्या या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र शिवतारे यांच्यावर पलटवार करताना अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, "विजय शिवतारे ही विषारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे. एखादा दिवा विझण्याआधी फडफड करतो, त्याप्रमाणेच विजय शिवतारे यांचाही राजकीय अंत जवळ आला आहे, त्यामुळे त्यांची फडफड सुरू आहे. शिवतारे यांना कोणीही साथ द्यायला तयार नाही. वेळ आली तर बलिदान द्यायचं, पण स्वराज्य वाचवायचं, असा पुरंदरचा इतिहास आहे. मात्र विजय शिवतारे हे दिलेर खान म्हणून जन्माला आले आहेत. शिवतारे एवढे बोलत आहेत म्हणजे त्यांना कोणत्या तरी मोठ्या नेत्याची साथ आहे. तो नेता सत्तेतलाही असू शकतो आणि विरोधी पक्षातीलही असू शकतो," असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. तसंच शिवतारे आता पातळी सोडून बोलू लागले आहेत. त्यांच्या मागचं डोकं नक्की कोण आहे, ते शोधावं लागेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, "थोड्या-फार पैशांसाठी विजय शिवतारे हे आपली बार्गेनिंग पॉवर दाखवत आहेत. मात्र त्यांचं राजकीय आयुष्य हे लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यापर्यंतच आहे. निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ," असा इशाराही अमोल मिटकरींनी दिला आहे.

विजय शिवतारे यांनी आज काय घोषणा केली?

विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असल्याचं सांगत आज थेट निवडणूक अर्ज भरण्याची तारीखही जाहीर केली आहे. "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

"पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे. हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत. मी दोन्ही पवारांविषयी माझ्या सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवारांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. सुप्रिया सुळेंनीही मागील १५ वर्षांत लोकांच्या हिताचं दोन टक्केही काम केलं नाही," असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला आहे.
 

Web Title: Amol Mitkari doubts the leaders of the Grand Alliance over vijay shivtare Candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.