“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:49 PM2024-06-27T23:49:12+5:302024-06-27T23:49:27+5:30
Amol Mitkari News: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का? इतर दोन पक्षांनीही प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
Amol Mitkari News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही चर्चेच्या विषय ठरल्या. यासह महायुतीतील धुसपुसही समोर आली. भाजपा कार्यकर्त्याने अजित पवारांना महायुतीत घेतल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त भाष्य केले आहे.
पुण्यातील शिरूरमध्ये एका बैठकीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. तसेच त्यांना महायुतीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली. यावरून आता अमोल मिटकरी यानी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपाचा कोणीतरी एक गल्लीतील कार्यकर्ता अजित पवारांवर बोलला. मग आम्ही हे शांततेने ऐकायचे का?, महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का? अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली.
महायुतीमधील तिन्ही पक्षांनी समन्वय साधणे महत्त्वाचे
महायुतीमधील तीनही पक्षांनी समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे. दुसऱ्यांची औकात काढण्यापेक्षा आपलीही औकात पाहिली पाहिजे, त्यानंतर बोलले पाहिजे. आमच्या पक्षाकडून आम्हाला नोटीस प्राप्त झाली, असे कळते आहे. अद्याप मला मिळाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि भाजपाने त्यांच्या प्रवक्त्यांना नोटीस दिली पाहिजे, या शब्दांत अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, आमच्या पक्षाला वाटते की महायुती टिकली पाहिजे. पण त्यांच्या पक्षाला वाटत नसेल म्हणून ते आवरत नाहीत. आमदार राहुल कुल तिथे होते. त्यांनी विरोध करायला हवा होता. एवढ्या मोठ्या नेत्यांवर कुणीही टीका करते आणि त्यांना कोणीही बोलत नसेल तर प्रश्न आहे. फक्त राष्ट्रवादीने नाही, तर इतर दोन पक्षांनीही प्रोटोकॉल पाळला पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.