निधीसाठी अमोल मिटकरी कमिशन घेतात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 20:02 IST2022-08-29T20:02:22+5:302022-08-29T20:02:50+5:30
वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत.

निधीसाठी अमोल मिटकरी कमिशन घेतात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) काल(दि.28) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मूर्तिजापूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी निधीसाठी कमिशन घेतात, असा आरोप केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी मिटकरींच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी जयंत पाटलांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
अमोल मिटकरींवर नेमका कोणता आरोप?
अमोल मिटकरी यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 50 कोटींचा निधी आणला, पण पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, जिल्हाध्यक्षांना निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे केला आहे. याशिवाय, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे आढावा बैठकीत केली.