अमोल मिटकरींकडून रावण मंदिरासाठी २० लाख निधी; हिवाळी अधिवेशनात करणार मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:24 AM2023-10-26T11:24:43+5:302023-10-26T11:25:33+5:30
आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे त्याची दैवते ही प्रत्येकाची दैवते असतात असं आमदाराने म्हटलं.
अकोला – दसऱ्याच्या दिवशी प्रथा परंपरेनुसार रावणाचं दहन केले जाते. परंतु आजही अनेक भागात रावणाला देव मानलं जातं. विशेषत: आदिवासी समाजात रावणाची पूजा केली जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील पातूर तालुक्यात असलेल्या सांगोळा इथं रावणाचं मंदिर असून येथील धर्म सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये देण्यात आले आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, एखाद्या राजकीय नेत्याच्या पुतळ्याचे दहन करायचे असेल तर त्याला पोलीस परवानगी लागते. रावण हा राक्षसांचा राजा होता असं पुस्तकात आहे. अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत. सांगोळा गावात रावणाची मूर्ती आहे. दसऱ्याच्या दिवशी येथील लोक रावणाचं दहन करत नाहीत. आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे त्याची दैवते ही प्रत्येकाची दैवते असतात. त्यामुळे रावण दहन करणाऱ्याच्या हाती रामाचे गुण अंगी असायला हवेत. रावण चरित्र्य, प्रखांड पंडित, शिवभक्त आणि अभ्यासू होता असं मिटकरींनी म्हटलं आहे.
तसेच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी स्वत: रावण दहनाविरोधात शासन निर्णय व्हावा असं मुख्यमंत्र्यासमोर मांडावे. कुणीही रावण दहन करू नये. आदिवासी समाजाच्या दैवताचा अपमान हा एकप्रकारे आदिवासी समाजाचा अपमान आहे. त्यामुळे या प्रथेला कायम निर्बंध घालते पाहिजे अशाप्रकारे मी प्रयत्न करणार आहे. भारतभर रावणाची बऱ्याच ठिकाणी पूजा होते. रावणाने कधी कुणाला त्रास दिला नाही. दुर्दैवाने अनेक कथा रंगवल्या जातात. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आमच्या जिल्ह्यात आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे असं आमदार अमोल मिटकरी म्हटलं.
दरम्यान, राजकीय नेत्यांचे पुतळे जाळले तरी गुन्हा दाखल होतो, पण रावण हा लंकेचा राजा होता. शिवभक्ताचा पुतळा जाळण्यामागे उद्देश काही लोकांचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा असतो. आम्ही रामाची पूजा करतो मग रावणाचे दहन कशाला? आदिवासी लोकांची भावना तीच माझी भावना आहे. रावण दहन करणारा जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. रावण दहन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्यासाठी अधिकृत शासन निर्णय व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.