अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल; राष्ट्रवादी नेत्याची जाहीर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:33 PM2022-04-21T16:33:47+5:302022-04-21T16:59:03+5:30
धर्माधिकारी यांच्या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यात मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान धर्माधिकारी यांनी केले आहे.
बीड – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीचा उल्लेख करत खिल्ली उडवल्याने आता राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिटकरी यांनी केलेल्या विधानानंतर ब्राह्मण महासंघाने पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच फेसबुकवर जाहीर पोस्ट करत अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान केले आहे. त्यामुळे मिटकरींच्या विधानामुळे राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे बीडमधील नेते, परळीतील माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, हिंदु धर्मात कधीच मम् भार्या समर्पयामी असा मंत्र नसतो. कदाचित मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेले हे तंत्र असू शकते. ही जाहीर खिल्ली आहे असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर धर्माधिकारी यांच्या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यात मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान धर्माधिकारी यांनी केले आहे.
तर बाजीराव धर्माधिकारी यांच्या पोस्टमध्ये धनंजय मुंडेही व्यासपीठावर उपस्थित होते तेही हसले अशी कमेंट्स केली. त्यावर धर्माधिकारी यांनी उत्तर देत धनंजय मुंडे एका जोकराच्या मिमिक्रीला हसले. माझं त्यांच्याशी बोलणं झाले आहे. हा विषय मुंडे यांनी खेद व्यक्त केला. ते कधीही कुणाचा द्वेष करत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिले. तर भाषण करता येते म्हणून आमदार करणं योग्य नाही या कमेंट्सला धर्माधिकारी यांनी खरं आहे असं म्हणत उत्तर दिले आहे.
मुस्लीम किंवा अन्य धर्मगुरुंची टिंगल करण्याची हिंमत होत नाही - भाजपा
अमोल मिटकरी यांच्या विधानावर टीका करताना भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते. अमोल मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लाऊन समाजाचे तुकडे करण्यात रस आहे असा आरोप भाजपाने केला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध ब्राह्मण महासंघ
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.