अमोल मिटकरींचं ‘ते’ विधान वैयक्तिक; वाद होताच राष्ट्रवादीनं हात वर केले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:43 PM2022-04-21T14:43:29+5:302022-04-21T14:44:07+5:30
कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदीच्या भोंग्यावरून केलेल्या विधानानंतर राज्यात राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका त्यांचा खाज ठाकरे म्हणून उल्लेख केला. त्याचसोबत इस्लामपूरच्या सभेत मिटकरींनी हनुमान चालीसेचं भाषणात पठण करून दाखवलं. मात्र हे करताना त्यांनी हिंदू धर्मातील कन्यादान प्रथेवर भाष्य केले.
अमोल मिटकरींच्या(NCP Amol Mitkari) वादग्रस्त विधानानंतर ब्राह्मण संघटनांनी त्यांना विरोध केला. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं, राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानावरून हात वर केले आहेत. जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवले नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील असंही धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी सांगितले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध ब्राह्मण महासंघ
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.