"...तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता", अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:26 PM2022-05-24T22:26:22+5:302022-05-24T22:39:05+5:30
Amol Mitkari : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाला मंजूरी दिल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात विचारणा केली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासाठी आमची दारे नेहमी खुली आहेत. ज्या पक्षात त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही. ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधे सन्मानाचे स्थान मिळाले नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, अमोल मिटकरी यांनी आज सकाळी ट्विटद्वारे मनसे आणि राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मनसेकडून शरद पवारांची बृजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट करत राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला होता. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असे ट्विटसोबत लिहिले होते.
"आधारवड". पवार साहेब! (काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही) (हिंदी भाषांतर जाणीवपपुर्वक टाळले आहे)@abpmajhatv@TV9Marathi@News18lokmat@saamTVnews@zee24taasnews@RajThackeraypic.twitter.com/ko0vIfX2th
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 24, 2022
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मध्यप्रदेश सरकारने ज्या प्रकारे ओबीसी आरक्षण टिकवून दाखविले, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही पावले उचलावी. काही मदत लागल्यास मी स्वत: मध्यप्रदेशात जायला तयार आहे. मी लागेल ती मदत करेन, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केले आहे. तसेच, ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्यासाठी ओबीसी नेते कमी पडत आहेत. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवणारे लोक कमी पडत आहेत. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण आमच्या हातातून गेलं, हा फार मोठा गुन्हा आहे. मी बोलले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.