अमोल यादव यांचे स्वदेशी विमाननिर्मितीचे स्वप्न साकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:37 AM2018-02-20T03:37:23+5:302018-02-20T03:37:36+5:30
कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमाननिर्मितीचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला
मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमाननिर्मितीचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. करारानुसार, त्यांच्या विमान कारखान्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून पालघर येथे १५७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या करारानंतर ‘लोकमत’शी बोलताना अमोल यादव यांनी सांगितले की, विमानांचे उत्पादन करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले होते. मात्र आता या सामंजस्य करारामुळे विमाननिर्मितीसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. विमाननिर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात असणार आहे.
एमआयडीसीकडून पालघरमध्ये देण्यात येणाºया १५७ एकर जागेवर हा कारखाना उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या सर्व परवानग्या एमआयडीसीने द्यायच्या असून माझी जबाबदारी विमाननिर्मितीची आहे. या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही. मात्र राज्य सरकारने जागा आणि अन्य पायाभूत सुविधा तसेच यासाठी लागणारा निधी देण्याचे मान्य केले आहे. या प्रकल्पातून सुमारे १० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.
दोन वर्षांत सहाशे
विमाने बनविणार
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चार प्रोटोटाइप विमाने बनविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन वर्षांत सहाशे विमाने बनविण्याचे लक्ष्य आहे. येथे १९ आसनी विमानांची बांधणी करण्यात येईल. पहिल्या चार आसनी विमानाची सर्व चाचणी पूर्ण झाली असून तपासणी व नोंदणीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. यात डीजीसीआयने काही अतिरिक्त गोष्टींचा समावेश करण्याच्या सूचना केल्या असून त्यानुसार लवकरच बदल करण्यात येणार आहेत, असेही यादव यांनी सांगितले.