भाजपच्या बड्या मंत्र्यांमध्ये महत्त्वाच्या खात्यांवरून धाकधूक; शिंदे गटात उद्योग खात्यावरून रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 07:28 AM2022-08-14T07:28:27+5:302022-08-14T07:30:22+5:30
भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खात्यांच्या वाटपावरून आता कोणताही वाद नाही. कोणाकडे कोणती खाती राहतील हे निश्चित झाले आहे पण शिंदे गटात खात्यांवरून स्पर्धा सुरू आहे.
मुंबई : गुजरात पॅटर्न आणून राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार यशस्वीपणे हाणून पाडलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना महत्त्वाचे खाते मिळणार की नाही, या बाबत धाकधूक असल्याचे म्हटले जाते.
फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळलेल्या तिघांचा पत्ता कट झाल्यासारखेच होते पण या तिघांनीही दिल्लीत फिल्डिंग लावली आणि मंत्रिपद खेचून आणले पण मंत्रिपद देताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांबाबत आपल्याला शब्द देता येणार नाही, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले अशी जोरदार चर्चा सध्या आहे.
या तिघांसह भाजपचे आणखी एक मंत्री महत्त्वाचे खाते मिळणार की नाही, या बाबत साशंक आहेत. चौघांनीही आता पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. आपण ज्येष्ठ असल्याने आपल्याला गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यापैकी महत्त्वाचेच खाते मिळेल, असे या चौघांपैकी प्रत्येकाला वाटत असताना त्यांना कमी महत्त्वाची खाती देण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू असल्याची माहिती आहे. या चौघांपैकी निदान एक-दोघांना कमी महत्त्वाची खाती देवून धक्का दिला जावू शकतो.
भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खात्यांच्या वाटपावरून आता कोणताही वाद नाही. कोणाकडे कोणती खाती राहतील हे निश्चित झाले आहे पण शिंदे गटात खात्यांवरून स्पर्धा सुरू आहे. गृह आणि वित्त विभाग भाजपकडे आणि नगरविकास शिंदे गटाकडे राहील. आदिवासी समाजाचे विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खाते दिले जाणार हे निश्चित मानले जात असताना यात बदलदेखील होवू शकतो अशीही चर्चा आहे. आदिवासी विकास खाते बिगर आदिवासी मंत्र्यांकडे याआधीही राहिले आहे.
शिंदे गटात उद्योग खात्यावरून रस्सीखेच
मुख्यमंत्री शिंदे गटात उद्योग खाते कोणाकडे यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. उदय सामंत आणि गुलाबराव पाटील या दोघांनाही हे खाते हवे आहे. दोघांनीही शिंदे यांच्याकडे हट्ट धरला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.