पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे, कृषीमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 05:11 PM2018-02-07T17:11:58+5:302018-02-07T17:12:26+5:30
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिल्या. गोंदिया, भंडाऱ्यात प्रायोगिक तत्वावर काम सुरू.
मुंबई : शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा फुंडकर यांनी सोमवारी घेतला.
खरीप हंगाम २०१७ मधील पीक विमा नुकसान भरपाईबाबत कार्यवाहीचा आढावा घेताना फुंडकर म्हणाले की, विमा कंपन्यांनी बँक स्तरावरील शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करुन घेऊन या याद्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावर जाहीर कराव्यात. नुकसान भरपाईस पात्र असलेला एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नुकसान भरपाईबाबतच्या प्रक्रियेला गती द्यावी.
रब्बी 2016 हंगामातील 27 कोटी 56 लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली असून संबंधित कंपनीने विमा योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी व शेतकरीनिहाय नुकसानभरपाईचा तपशील असलेली माहिती पीक विमा पोर्टल आणि विमा कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी. तसेच कृषी विभागालाही नुकसानभरपाईच्या रक्कमेसह याद्या उपलब्ध करुन द्याव्यात.
पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांमध्ये डीबीटीद्वारे नुकसान भरपाई जमा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. यावेळी खरीप 2018 च्या अनुषंगाने पीक विमा नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.