खामगाव कृउबासच्या माजी संचालकांकडून वसूल होणार आर्थिक अपहाराची रक्कम
By admin | Published: January 9, 2016 02:38 AM2016-01-09T02:38:22+5:302016-01-09T02:38:22+5:30
जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश, १५ दिवसात ६६ लाख ६२ हजाराची वसुली करण्याचे आदेश.
बळीराम वानखडे/खामगाव: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी १८ संचालक आणि तत्कालीन सचिव यांच्याकडून ६६ लाख ६२ हजार ४२६ रूपये १५ दिवसात वसूल करावे, अन्यथा १५ दिवसात त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिले असून, दोन्ही प्रक्रियेत कसूर झाल्यास विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २00९ ते २0१४ पर्यंत सभापती राजाराम काळणे, उपसभापती गोपाळराव कोल्हे आणि त्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात होते. या काळात झालेल्या आर्थिक अपहाराबाबत सामाजिक कार्यकर्ते नंदु भट्टड यांनी तक्रार करून, याप्रकरणी ११ मुद्यांवर चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनुसार नऊ मुद्यांवरील चौकशी अहवाल १४ डिसेंबर २0१४ रोजी बुलडाणा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याचे करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक एम.ए. कृपलानी यांना देण्यात आले होते. सहायक निबंधकांनी चौकशी करून आर्थिक अनियमिततेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्व १८ संचालक आणि तत्कालीन सचिवांवरही ठपका केल्याने खळबळ उडाली होती. सर्व जण प्रत्येकी ३ लाख ५0 हजार ६६४ रुपयांच्या अपहारासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट करून, त्यांनी एकूण ६६ लाख ६२ हजार ४४६ रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. हा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे ४ जानेवारी रोजी सादर करण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी यांनी ७ जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश देऊन, दोषींकडून ६६ लाख ६२ हजार ४२६ रूपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.