एसटीच्या भू-भाड्याची रक्कम वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:33 AM2019-11-18T02:33:42+5:302019-11-18T02:34:04+5:30
भू-भाड्याच्या रकमेवर १८% वस्तू व सेवा कर
मुंबई : एसटीच्या भू-भाड्यांच्या रकमेवर आता वस्तू आणि सेवा कर आकारण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याद्वारे जप्त केलेली वाहने एसटी आगारात पार्किंग केली जातात. या पार्किंग केलेल्या प्रतिवाहनावर भू-भाडे म्हणून ५० रुपये आकारले जातात. आता या ५० रुपये भू-भाड्यावर वस्तू आणि सेवा लागणार आहे. परिणामी एसटीच्या भू-भाड्यांची रक्कम वाढणार आहे. त्यानुसार, राज्यातील विभाग नियंत्रकांना या भू-भाड्याच्या रकमेत १८ टक्के वस्तू आणि सेवा कर एकत्र करून एकूण रक्कम वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत.
वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागांच्या पथकांद्वारे राज्यभरातील अवैध वाहतूकीस आळा घालण्यासाठी तपासणी केली जाते. यामध्ये अवैध वाहनांवर कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान अवैध असलेल्या वाहनांची पार्किंग एसटी महामंडळाच्या आगारात केली जाते. एसटी महामंडळाकडून भू-भाडे म्हणून प्रतिवाहन ५० रुपये आकारले जातात. ही रक्कम पार्किंग केलेल्या वाहन मालकांकडून वसूल करण्यात येते. आता या रक्कमेवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे. त्यानुसार ही रक्कम ५९ रुपये होणार आहे. ही रक्कम पार्किंग केलेल्या वाहन मालकांकडूनच वसूल करण्यात येईल.
एसटीतून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडाची रक्कम वाढणार आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास, दंडाच्या रकमेसह १८ टक्के वस्तू व सेवा करही भरावा लागणार आहे.
एसटी महामंडळाने राज्यातील सर्व तिकीट तपासनिसांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे किमान १०० रुपयांच्या दंडावर १८ रुपयांचा कर आकारला जाणार आहे.