समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

By admin | Published: July 13, 2017 01:02 AM2017-07-13T01:02:09+5:302017-07-13T01:02:09+5:30

समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले

The amount of money paid for the same water scheme | समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला. सर्व निविदा निश्चित रकमेपेक्षा सरासरीने २६ टक्के दराने जास्त असल्याने यात प्रशासनही सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. १ हजार ७४८ कोटी रुपयांचे हे काम आहे व जादा दरामुळे त्यात महापालिकेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला. शिंदे यांनी याआधीच कोणत्या चार कंपन्या यात निविदा दाखल करणार आहेत ते जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्याच चार कंपन्यांनी या निविदा दाखल केल्या आहेत. १ हजार ७४८ कोटी रुपयांच्या एकाच प्रकारच्या कामाचे चार तुकडे करून त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या होत्या.
चार कंपन्यांनी प्रत्येक कामासाठी प्रत्येकी चार निविदा दाखल केल्या. त्यात चौघांपैकी एकाने प्रत्येक कामात दुसऱ्यापेक्षा कमी दराने, पण एकूण कामापेक्षा जास्त दराची अशी निविदा दाखल केली. त्यामुळे दाखवण्यासाठी स्पर्धाही झाली व प्रत्येकाला कामही मिळाले. हे सर्व प्रशासन व अधिकारी यांच्या संगनमतातून ठरवून झाले असल्याचे तुपे व शिंदे म्हणाले. प्रत्येक निविदा साधारण २६ टक्के जादा दराने आलेली आहे. महापालिकेला त्याच्या एकूण कामात ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.
>फेरनिविदा काढावी
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची जादा दराने आलेली निविदा राज्य सरकारने हस्तक्षेप करून रद्द करायला लावली. आता या त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च असलेल्या कामाच्या निविदेतही सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तुपे, शिंदे यांनी केली. या संपूर्ण कामाची फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली. पारदर्शकता शब्दाचा योग्य वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही संधी आहे, असे ते म्हणाले. सरकारने दखल घेतली नाही, तर या निविदा प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
>पाणी योजनेसारखी कामे दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळेच कंपन्या त्याचा विचार करून जादा रकमेच्या निविदा दाखल करतात. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात भामा आसखेड किंवा पर्वती जलशुद्धीकरणाच्या निविदाही ३० टक्के जादा दराने आल्या होत्या.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती
>धनकवडी : येथील राजे चौक परिसरात बुधवारी सायंकाळी ४ वाजता जलवाहिनीवर बसवण्यात आलेला प्रेशर व्हॉल्व्ह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्त करीत असताना हजारो लिटर पाणी वाया गेले. उताराकडे येणाऱ्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीमधील पाणी दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून वाहून गेले.
प्रेशर व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे आंबेगाव पठार परिसराला पाणीपुरवठा होणार नव्हता. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. खोदाई करून व्हॉल्व्हची पाहणी केल्यावर, त्यातील महत्त्वाचा भाग निकामी झाल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण व्हॉल्व्ह खोलून वर काढताच जलवाहिनीतील शिल्लक साठलेले पाणी मोठ्या दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून लोट वाहू लागले. त्यानंतर तळजाई पाण्याच्या टाकी परिसरातील व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. दरम्यान, जलवाहिनीत साठलेले पाणी तासाभरात हजारो लिटर वाहून गेले. काही दुकानांसमोर पाण्याची तळी साठली होती.

Web Title: The amount of money paid for the same water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.