आॅनलाइन लांबविली लाखाची रक्कम
By admin | Published: January 7, 2017 01:05 AM2017-01-07T01:05:20+5:302017-01-07T01:05:20+5:30
आॅनलाईन फ्रॉडद्वारे नागरिकांच्या खात्यांमधून १ लाख १८ हजार ७३५ रुपये काढून घेण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या
पुणे : आॅनलाइन फ्रॉडद्वारे नागरिकांच्या खात्यांमधून १ लाख १८ हजार ७३५ रुपये काढून घेण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी विश्रामबाग, कोंढवा, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समीर शिंदे (वय ३३, रा. शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गौतम मंडरल (रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिंदे यांच्या मोबाईलवर फोन केला. चांगल्या कस्टमर केअरचा नंबर पाहिजे असल्यास २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. शिंदे यांचे नारायण पेठेत दुकान आहे. आरोपीच्या सांगण्यावरून शिंदे यांनी ही रक्कम भरली. परंतु त्यांना नवीन कस्टमर नंबर देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. तर कोंढव्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश इंद्रायनी (वय ५८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
इंद्रायनी यांना बुधवारी एकाने मोबाईलवर फोन करुन बँक खात्याला एलपीजी गॅससाठी सबसिडी लिंक करायची असल्याचे सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डाचा क्रमांक, सीव्हीसी क्रमांक व ओटीपी मागवून घेतला. या माहितीचा वापर करुन पेटीएमद्वारे ४७ हजार ७३५ रुपये काढून घेत फसवणूक केली.
(प्रतिनिधी)
>एटीएमच्या रांगेत उभ्या असलेल्या अशोक शिरभाते (वय ६१, रा. विमाननगर) यांच्या जवळचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे ४६ हजारांचे सोने खरेदी करण्यात आले. ही घटना विमाननगर येथील गिगास्पेसजवळ १९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी सय्यद कलाऊदिन खान (वय २३, रा. वडगावशेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.