अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टचे लोकार्पण
By admin | Published: November 6, 2016 01:52 AM2016-11-06T01:52:18+5:302016-11-06T05:15:44+5:30
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात तसेच कला व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक काम करण्याच्या उद्देशाने अमरापूरकर कुटुंबीय
अहमदनगर : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात तसेच कला व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक काम करण्याच्या उद्देशाने अमरापूरकर कुटुंबीय व त्यांच्या चाहत्यांनी स्थापन केलेल्या सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा, कनिष्ठ बंधू राजाभाऊ, खा़ दिलीप गांधी, चेतना सिन्हा व सुमित्रा भावे यांनी अमरापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला़ राजाभाऊ म्हणाले, सदाशिव गेल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी मुंबई येथे सुतारकाम करणारी व्यक्ती नगर येथे आमच्या घरासमोर येऊन रडत होती़ त्याने सांगितले की, तात्या मुंबईत जेव्हा शूटिंगसाठी यायचे तेव्हा ते माझ्यासमवेत बसून निवांत गप्पा मारत असे़ माझे सुख-दु:ख ते विचारायचे, त्यांचा मोठा आधार वाटत होता़ सदाशिवच्या याच आठवणी कायम स्मरणात राहाव्यात या उद्देशातून ही ट्रस्ट स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले़ सुनंदा अमरापूरकर म्हणाल्या, अमरापूरकर यांच्या सानिध्यात आलेली माणसे त्यांना कधी विसरणार नाहीत़ ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा उद्देश आहे़ त्यांच्या नावे स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी ‘ग्रामीण स्त्रीचे सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान दिले़ सुमित्रा भावे यांनीही आठवणींना उजाळा देत साहित्य आणि कला क्षेत्राविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ डॉ़ उमा कुलकर्णी, विनोद शिरसाठ, रिमा अमरापूरकर, डॉ़ आनंद नाडकर्णी यांच्यासह अमरापूरकर यांचे चाहते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)