अमरावतीमध्ये पाच वर्षांत २२ वन कर्मचा-यांवर हल्ले
By admin | Published: September 22, 2014 02:08 AM2014-09-22T02:08:59+5:302014-09-22T02:08:59+5:30
छुप्या मार्गाने चराई केल्यावरून उद्भवलेल्या वादात पाच वर्षांत जिल्ह्यातील २२ वन कर्मचारी व अधिका-यांवर प्राणघातक हल्ले
अमरावती : राज्यातील २७ वनविभागांसह अमरावती जिल्ह्यातील वनक्षेत्रात चराईसाठी बंदी आहे. मात्र, छुप्या मार्गाने चराई केल्यावरून उद्भवलेल्या वादात पाच वर्षांत जिल्ह्यातील २२ वन कर्मचारी व अधिका-यांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस नोंदीतून उघड झाली आहे़
जिल्ह्यातील मेळघाटक्षेत्र वगळता अमरावती वनविभागात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे़ वडाळी, मोर्शी, चांदूररेल्वे, परतवाडा, वरूड तालुक्यांचा यात समावेश आहे़ मौल्यवान सागवान, खैर, साजड, अंजन, सालई, अन्नपूर्णा तसेच वनौषधी म्हणून बीबा, चारोळी व अनेक वनौषधी आहेत़
२०० प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती असून, वड, पिंपळ, उंबर यांवर हे पक्षी वास्तव्य करतात़ परंतु वनचराईच्या वाढत्या प्रकारामुळे आज या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे़ राज्य शासनाने ४८ वनविभागांत चराई जमाबंदीचे आदेश ६ मे २००८ रोजी काढले. अमरावती जिल्ह्यात पश्चिम मेळघाट, पूर्व मेळघाट व अमरावती वनविभागाचा समावेश आहे़ परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना न जुमानता या भागात चराई केली जात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली़