अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

By admin | Published: November 9, 2016 05:18 AM2016-11-09T05:18:51+5:302016-11-09T05:18:51+5:30

मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना

Amravati disciplines over IG | अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

Next

मुंबई/अमरावती : मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी तातडीनेमुंबईला पाचारण केले आहे, तर गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी यासंदर्भात अहवाल मागविला आहे. एकूण घडामोडी बघता जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
आयजी जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलिस अधिकारी व मित्रांना व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवून ‘मराठा असल्याने माझा छळ होतोय आणि या छळाला कंटाळून मी आत्महत्या करेन. आत्महत्येसाठी डीजीपी जबाबदार राहतील’, अशी धमकी दिल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
यासंदर्भात मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच डीजीपी माथूर यांनी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून अर्धा तास चर्चा केली. सविस्तर चर्चेकरिता त्यांनी जाधव यांना मुंबईला पाचारण केले आहे.
लवकरच जाधव डीजीपींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. पोलिस दलाच्या आचारसंहितेनुसार वरिष्ठांवर जाहीरपणे आरोप करता येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जाधव यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)


गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी पत्रकारांना सांगितले की जाधव यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अहवाल देण्यास माथूर यांना राज्य शासनाने सांगितले आहे. ते लवकरच अहवाल देतील. माथूर यांना जाधव प्रकरणी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. तथापि, पोलीस गृहनिर्माणबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर आज सादरीकरण होते आणि त्यासाठी माथूर यांना बोलविलेले होते. हे पूर्वनियोजितच होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क विभागाने केला.


सांगली : माझ्याकडे गृह खाते होते, त्यावेळी पोलिसांमध्ये अंडरकरंट प्रांतीयवाद होता. मराठा नव्हे, तर मराठी भाषिक पोलिसांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा गृह खात्याने केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण भारतीय पोलिस व स्थानिक मराठी भाषिक पोलिसांमध्ये वादाचा अंतर्प्रवाह होता. तो उघडपणे नसला तरी, त्याचे अस्तित्व जाणवत होते. जाधव यांनी अशाप्रकारची तक्रारी केली असेल, तर निश्चितपणे काही तरी घडले असणार. वरिष्ठ पदावरील व्यक्ती अशी खदखद व्यक्त करीत असेल, तर त्याची दखल घेतली पाहिजे.

Web Title: Amravati disciplines over IG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.