अमरावती विभागातील पर्जन्यमापक यंत्रांची होणार दुरुस्ती!
By admin | Published: April 21, 2017 12:28 AM2017-04-21T00:28:01+5:302017-04-21T00:28:01+5:30
अकोला- यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत.
संतोष येलकर - अकोला
यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत. यासंबंधी विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद करण्यासाठी सन २०१३ मध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील गावांमध्ये शासनामार्फत पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पडणाऱ्या पावसाची नोंद दररोज संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाते. पर्जन्यमापक यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीची माहिती दररोज तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासनाकडे सादर केली जाते.
या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित आहेत की नाहीत, याबाबतची पडताळणी करून तांत्रिक बिघाड असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांच्या दुरुस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यमापक यंत्रांचे पाणीपात्र आणि ‘मेजरिंग ग्लास’च्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.