अमरावती : कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 03:44 PM2018-01-10T15:44:12+5:302018-01-10T15:47:18+5:30
अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली.
परतवाडा (अमरावती) : अमरावतीच्या अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान जखमी काळविटाचा पशूवैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
अचलपूर शहरालगत चारा असल्याने शहापूर, नौबागपुरा जंगलातील वन्यप्राण्यांचा तेथे वावर वाढला आहे. सोमवारी मेहराबपुरा, एकतानगर या जगदंब महाविद्यालयाच्या परिसरामागे एक काळवीट भरकटत होते. येथील मोकाट कुत्रे त्याच्या मागे लागले, एका युवकाची नजर त्याच्यावर पडली. त्याने जखमी काळविटाला सरमसपुरा पोलीस ठाण्यात नेले.
ठाणेदार अभिजित अहिरराव यांनी पशूवैद्यकीय दवाखान्यात नेले. डॉ. पी.पी. चौकसे यांनी उपचार केले. याची माहिती परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांना देण्यात आली. काळविटाला बचावण्याचा प्रयत्न पंकज चव्हाण, गौरव डकरे, प्रदीप घोरडे, रितेश बोसोदे, अब्दुलभाई यांनी केला. मात्र तो अपयशी ठरला.