अमरावतीच्या तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार, चौघांना अटक
By admin | Published: April 19, 2016 03:59 PM2016-04-19T15:59:54+5:302016-04-19T15:59:54+5:30
पुण्यात अमरावतीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - पुण्यात अमरावतीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन मित्रांसह चौघांना अटक केली आहे.
पीडित मुलगी ही मुळची अमरावतीची असून ती पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत आहे. तिने दिलेल्या तक्रारीत तिचा मित्र विकी याने फोन करून जेवण करायला बाहेर जाऊ असे सांगून रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास वारजे पूला खालून गाडीत बसवले. त्यानंतर चांदणी चौक मार्गे वाकडला जात असताना बावधन परिसरात चालू गाडीत विकीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पिंपळे गूरव या ठिकाणी त्याचा आणखी एक मित्र गाडीत बसला व तेथून पुढे गाडी देहू रोडला नेण्यात आली.
देहू येथे हे सर्व जण मित्राच्या साखरपुडयाला गेले. मात्र या कार्यक्रमाला जात असताना आरोपींनी पीडितेस गाडीत बसवून गाडी लॉक केली, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पीडित मुलीने सांगितले आहे. यानंतर हे सर्व जण रात्री अकरा वाजता निघाले. त्यानंतर गाडीत असलेल्या अगोदरच्या तिघांखेरीज आणखी एक अनोळखी व्यक्ती गाडीत आली. त्यानंतर वाटेत लागलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण केले. या ठिकाणी सर्वांनी मद्य प्राशन केले. तसेच पाडितेसही जबरदस्तीने मद्य पाजले. दरम्यान, यानंतर मनिष नावाचा मुलगा या ठिकाणाहून निघून गेला. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पीडितेवर अत्याचार केला.
या सर्व घटनेनंतर पीडित मुलीने १०० क्रमांकावर फोन लावला असता विकी नावाच्या मुलाने फोन हिसकावून घेत. फोन बंद केला व मनिषला त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर मनिषने पीडित मुलीचा गळा दाबून हाताने मारहाण केली व पोलीस आमचे काही बिघडू शकत नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी कलम ३७६, ड ३५४ , ५०६ , ५०४, ३२३ , ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.