अमरावती: मतदार नोंदणीसाठी ‘पदवीधर’ उदासिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 09:58 PM2016-10-24T21:58:29+5:302016-10-24T21:58:29+5:30

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याकरिता ‘पदवीधर’ उदासिन असल्याचे दिसून येत आहे.

Amravati: 'Graduate' for Voters Registration! | अमरावती: मतदार नोंदणीसाठी ‘पदवीधर’ उदासिन!

अमरावती: मतदार नोंदणीसाठी ‘पदवीधर’ उदासिन!

googlenewsNext

गणेश मापारी /ऑनलाइन लोकमत

खामगाव, दि. 24 - अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याकरिता ‘पदवीधर’ उदासिन असल्याचे दिसून येत आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २३ आॅक्टोबरपर्यंत केवळ २५ हजार ४४१ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय पक्षांच्या  उमेदवारांप्रमाणेच प्रशासनासाठीही ही चिंतेची बाब बनली आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जुनीच मतदार यादी गृहीत धरण्यात आली होती. या यादीवर आक्षेप घेण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने नवीन मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार अमरावती पदवीधर मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत नाव नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. १ आॅक्टोबर २०१६ ते ५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे उमेदवार देखील पदवीधर मतदार संघातील मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही २३ आॅक्टोबरपर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये केवळ २५ हजार ४४१ मतदारांची नोंदणी झाली आहे.
मतदार नोंदणी करण्याकरिता अवघा १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असून यामध्येही काही सुट्याही येणार आहेत. त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या नवीन मतदारांचा टक्का फारसा वाढणार नसल्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान जानेवारी २०१७ च्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच मतदारांची संख्या मात्र फारच कमी असल्याने मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला पुन्हा कार्यक्रम लावावा लागणार आहे. परिणामी निवडणूक सुध्दा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारांचेही आटोकाट प्रयत्न
अमरावती पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार तथा गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील, काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांच्यासह या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक असलेल्या अपक्ष उमेदवारांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केले आहेत. डॉ.रणजित पाटील आणि संजय खोडके यांच्या समर्थकांनी अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधील मोठ-मोठ्या शहरांमध्ये मतदार नोंदणी केंद्र सुरु केले आहेत. त्याचप्रमाणे डॉ.पाटील आणि खोडके यांच्याकडून विविध ठिकाणी घेण्यात येत असलेल्या बैठकीमध्ये देखील मतदार नोंदणी वाढविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पदवीधर मतदारसंघातील मतदारांची तुलना
जिल्हा             जुने मतदार           नवीन नोंदणी झालेले मतदार
अकोला-             ३६९७९                             ३८०८
बुलडाणा-            २४२३९                             ५०८७
अमरावती-           ६७८७६                             ८७६८
वाशिम-               ११९६३                              ३४४९
यवतमाळ-            ३०१२३                             ४३२९
-------------------------------------------------------------------
एकूण                  १६७१५०                              २५४४१


पदवीधर मतदार संघासाठी मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणीही बैठक घेण्यात येत आहे.
- रमेश मावस्कर
उपायुक्त(सामान्य) अमरावती विभाग

Web Title: Amravati: 'Graduate' for Voters Registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.