अमरावती : वडिलांची हत्या करणा-या मुलाला जन्मठेप, 2016 मधील बेनोडा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 09:46 PM2017-08-23T21:46:31+5:302017-08-23T21:47:01+5:30
क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
अमरावती, दि. 23 - क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रवीण ऊर्फ बाल्या रामदासपंत निकम (३७,रा. सांवगा, ता.वरुड) असे आरोपीचे नाव आहे. बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ जुलै २०१६ रोजी ही घटना घडली.
सरकारी विधीतज्ज्ञ सुनील देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्ता सुनील ऊर्फ रामदासपंत निकम व त्याची आई सिंधूताई निकम हे २७ जुलै रोजी शेतात पेरणीचे काम करीत होते. आरोपी प्रवीण तेथे आला आणि बैलजोडी घरी असतानाही पुन्हा विकत का घेतली, या कारणावरून त्याने आईशी वाद केला. याच कारणावरून पुन्हा दुपारी प्रवीणने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सिंधूताई जखमी झाल्या. त्यांनी उपचारासाठी दवाखाना गाठला. याच दरम्यान प्रवीणचे वडिल रामदास दशरथ निकम (५५) हे घरी परतले असता प्रवीणने वडिलांच्या डोक्यावर खलबत्ता मारला. त्यामुळे रामदास निकम हे गंभीर जखमी झाले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी राहुल होले व कमला साबळे होते. रामदास यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याघटनेची तक्रार प्रवीणचा भाऊ सुनील निकम याने बेनोडा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (५) व्ही.एस.तिवारी यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता सुनील देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी प्रवीण निकमला हत्याप्रकरणात जन्मठेपेची तर भादंविच्या कलम ३२३ अन्वये एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजारांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त शिक्षेचे आदेश दिलेत.