Amravati Lok sabha Election Result 2024: अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:29 PM2024-06-04T18:29:00+5:302024-06-04T18:51:07+5:30
Amravati Lok sabha Election Result Update: महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे.
अमरावतीमधून मोठी बातमी येत आहे. पराभवाच्या छायेत असलेल्या भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी पिछाडीवर असल्याने फेर मतमोजणीसाठी अर्ज केल्याचे समोर येत आहे. खासदार अनिल बोंडे यांनी ही माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नवनीत राणा यांना 470140 मते पडली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे (BALWANT WANKHADE) यांना 489464 मते मिळाली आहेत. राणा या सध्या 19324 मतांनी पिछाडीवर असून जवळपास पराभवाच्या छायेत आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मी आलो आहे असे बोंडे म्हणाले. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत. आम्ही कोणत्या बुथवर कमी पडलो कोणत्या मतदारसंघात कमी पडलो हे पूर्ण पाहून आम्ही आत्मचिंतन करू, असे बोंडे यांनी म्हटले आहे. मतांचा फरक जर कमी असला व पोस्टल बॅलेटचे मत असल्यास फेरमतमोजनी करणे आवश्यक असते. त्यासाठी मी आलो असल्याचे बोंडे म्हणाले.
बच्चू कडूंच्या पक्षाने राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. या उमेदवाराने राणांची 79445 मते घेतली आहेत. यामुळे राणांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णय महाविकास आघाडीला धक्का तर महायूतीला बळ देणारे ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता. २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी ५६ हजारांच्या जवळपास मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. परंतु यंदा अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी स्वत: रिपब्लिकन सेनेतून उमेदवारी दाखल केल्याने वंचितने त्यांना पाठिंबा दिला. तसेच बाबासाहेबांचा नातू म्हणून जिल्ह्यातील आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी आशा आनंदराज आंबेडकरांना होती. परंतु आंबेडकरांना 15843 मते मिळाली आहेत.