व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीला
By admin | Published: March 18, 2017 02:34 AM2017-03-18T02:34:03+5:302017-03-18T02:34:03+5:30
देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या वेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती
मुंबई : देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या वेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील राहणार आहेत. १९ आणि २० मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या २५ व्यक्ती तसेच १६ संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. विचारमंथन करण्यात येणार आहे. राज्यातील विविध विषयांतील मान्यवर विचारवंत, अभ्यासक, लेखक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘व्यसनमुक्तीचा आॅर्केस्ट्रा’चे आयोजन केले आहे. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय साहित्य संमेलनाला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)