नवनीत राणा यांना 'हनुमान चालिसे'चं फळ मिळणार? पती रवी राणा शिंदे सरकारमध्ये मंत्री होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 02:26 PM2022-08-04T14:26:33+5:302022-08-04T14:27:52+5:30
या दांपत्यने उद्धव ठाकरे यांना आव्हान देत 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर, या दंपत्याला अटकही करण्यात आली होती.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालिसेच्या मुद्द्यावर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. एवढेच नाही, तर या दांपत्यने उद्धव ठाकरे यांना आव्हान देत 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर, या दंपत्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना 'हनुमान चालिसे'चे फळ मिळण्याची शक्यता आहे. राज्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून यात रवि राणा यांनाही संधी मिळू शकते. रवि राणा यांनीही एकनाथ शिंदे सरकारला आपला पाठिंबा दिला आहे.
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या राणा दांपत्याच्या घोषणेनंतर, मुंबई पोलिसांनी 23 एप्रिलला नवनीत राणा आणि रवि राणा या दोघांनाही अटक केली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर, वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याच्या आरोप केला होता. या दांपत्यावर खार पोलीस ठाण्यात कलम 153 (A), 34, IPC r/w 37(1) 135 मुंबई पुलीस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर, राणा दांपत्याने उद्धव ठाकरेंवर संबंधित घटना घडवून आणल्याचा आरोप करत, पलटवार केला होता. यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्रास देण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तर त्यांचे पती रवी राणा यांनी, उद्धव ठाकरे यांना केवळ राजकीय फायदा हवा आहे, असे म्हटले होते.