अमरावती: पीडीएमसीत 'परिवर्तन'; ‘डीन’चा राजीनामा, सोमवंशींचा मार्ग प्रशस्त : वसंत लवणकरांकडे प्रभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 07:35 PM2017-09-17T19:35:15+5:302017-09-17T19:35:54+5:30
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या परिवर्तनाचा पहिला फटका डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया (पीडीएमसी)च्या अधिष्ठात्यांना
अमरावती, दि. 17 - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या परिवर्तनाचा पहिला फटका डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया (पीडीएमसी)च्या अधिष्ठात्यांना बसला आहे. स्वत:ची संभाव्य गच्छंती ओळखून अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी उशिरा रात्री त्यांच्या पदाचा राजीनामा नव्या कार्यकारिणीकडे सोपविला. त्यांचा हा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आहे. तूर्तास अधिष्ठातापदाचा पदभार वसंत लवणकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) अधिष्ठातापदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना मावळत्या कार्यकारिणीने अभय दिल्याने त्या पदावर दिलीप जाणे कार्यरत होते. विशेष म्हणजे जाणे यांना हटवून पद्माकर सोमवंशी यांना अधिष्ठातापदी रूजू करून घेण्याचे आदेश आरोग्य विद्यापीठ व नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांनी ते आदेश डावलत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. चार दिवसांपूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेचे सुकाणू हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे आले आहेत. देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलने नऊपैकी आठ जागा जिंकून शिवाजी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. हर्षवर्धन देशमुख आणि नवे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले हे सोमवंशी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. आता तेच कार्यकारिणीत आल्याने गच्छंती अटळ असल्याचे ओळखून दिलीप जाणे यांनी आधीच पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या राजीनाम्याने सोमवंशी यांचा मार्ग प्रशस्त झाला असला तरी त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत.
मागील अनेक दिवसांपासून राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत होतो. शनिवारी रात्री त्याला मूर्तरुप दिले. राजीनाम्याला संस्थेतील परिवर्तनाची पार्श्वभूमि नाही.
-दिलीप जाणे, माजी अधिष्ठाता, पीडीएमसी