"जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही"; भाजप खासदाराचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 09:32 PM2024-08-11T21:32:57+5:302024-08-11T21:33:14+5:30
सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असे खासदार अनिल बोंडेंनी म्हटलं आहे.
अमरावती : राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून रान पेटलेले असतानाच मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असा हल्लाबोल भाजपचे नेते तथा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती येथे केला.
अमरावती येथील भाजप कार्यालयात रविवारी जिल्हा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खा. बोंडे यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांना पुन्हा डिवचल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर रक्ताचे नाते असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच असून ते ओबीसीमध्ये येणार आहेत. पण, सग्यासोयऱ्यांना ते कदापीही मिळणार नाही, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणीही तशा वल्गना करू नये, तसेच समाजात फूट पाडण्याचे काम जरांगे यांनी करू नये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल,अशी पुष्टीही खा. डॉ. अनिल बोंडे यांनी जोडली.