अमरावतीमध्ये लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

By admin | Published: July 18, 2016 08:24 PM2016-07-18T20:24:03+5:302016-07-18T20:24:03+5:30

घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालण्यात आली. यातील केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या

In Amravati, there is a great deal of privilege | अमरावतीमध्ये लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

अमरावतीमध्ये लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

Next

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. १८ -  घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालण्यात आली. यातील केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटा गावानजीकच्या संत्राबागेत हा प्रकार उघड झाला. मारोती सहदेव वाघमारे (६५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून शेतमालक मनोज वसंत जगताप याच्यासह अन्य नऊ जण घटनास्थळावरून पसार झालेत. वनविभागाने घोरपडीचे शिजविलेले मांस व अन्य साहित्य घटनास्थळावरून जप्त केले.
वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून उपवनसरंक्षक हेमंत मिना यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने पिंपळखुटा येथील मनोज जगताप यांच्या शेतशिवारात धाड टाकली. त्यावेळी तेथील संत्रावाडीत पार्टी सुरू असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. वनकर्मचाऱ्यांना पाहताच घोरपडीच्या मटणावर ताव मारणाऱ्यांनी तेथून पोबारा केला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी चौकीदार मारोती वाघमारे याला ताब्यात घेतले. शेतमालकांसह अन्य नऊ जण पसार झालेत. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे शिजविलेले मांस व हाडांचे काही तुकडे आढळून आले. घटनास्थळावरून मांस, हांडांचे तुुकडे, कुऱ्हाड, सुरी, भांडे असे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात वनविभागाने आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९७२ मधील कलम ९, ३९,(३) (अ) (ब) (क), ४४, (१), (बी), (३८(अ), ४९, ४९बी, (१) (बी) ५१ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. शिजविलेले ते मांस तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणातील पसार झालेल्या अन्य आरोपींना अटक करण्याकरिता तीन पथके विविध भागांत रवाना झाली आहेत. 

शेतमालकाने दिली घोरपडीची मेजवानी

पिंपळखुट्यातील शेतमालक मनोज जगताप याने त्याच्या मित्र मंडळीला घोरपडीची मेजवानी देण्यासाठी बोलाविले होते. मात्र, त्याचवेळी वनविभागाने ही धाड टाकली. त्यावेळी जगतापसह त्याचे मित्र असलेले अभियांत्रिकी महाविद्यालयातील लेखापाल रवींद्र इंगळे, विलास डहाके (रा.पिंपळखुटा) यांच्यासह सहा आरोपी पसार झालेत. या कारवाईत सहायक वनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वनाधिकारी अशोक कविटकर, सहायक वनसरंक्षक एस.डी.सोनवने, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.पडगव्हाणकर, पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, पिंपळखुटा बिटचे वनरक्षक ए.जी. महाजन, वनकर्मचारी मनोज ठाकूर, विजय बारब्दे, अमोल गावनेर, वनरक्षक फरतोडे, अनिता वसे, नीलेश करवाळे, बाबुराव येवले, आर.आर.खडसे, नितीन नेतनवर, विलास देशमुख, पी.बी.शेंडे यांनी सहभाग घेतला.

पाच ते सहा घोरपडी मारल्याची शंका
पिंपळखुटा शेतशिवारातील घोरपडीच्या मासांच्या मेजवानीत सहभागी आरोपींनी पाच ते सहा घोरपडीची शिकार करून मांस शिजविल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या मटणावरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून पिंपळखुटा येथील एका शेतातून घोरपडीचे मांस शिजविताना एकाला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
- संजीव गौड,
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक).

घोरपड या वन्यप्राण्याचे मांस शिजविणाऱ्या एकाला ताब्यात घेतले, तर नऊ आरोपी पसार झालेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.
- हेमंत मिना,
उपवनसरंक्षक, अमरावती.

Web Title: In Amravati, there is a great deal of privilege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.