अमरावती विद्यापीठात कंत्राटी भरतीला ‘ब्रेक ’
By admin | Published: June 24, 2016 05:12 AM2016-06-24T05:12:28+5:302016-06-24T05:12:28+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पदभरतीवर बुधवारी राज्यपालांनी ‘ब्रेक’ लावला आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पदभरतीवर बुधवारी राज्यपालांनी ‘ब्रेक’ लावला आहे. त्यामुळे शिपाई आणि लिपिक पदासाठी बोलविलेल्या निविदा उघडण्यात आल्या नाहीत. मात्र, राज्यपालांकडून याबाबत आदेश आल्याच्या बाबीला विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला आहे.
खासगी एजन्सीमार्फत ७३ लिपिक आणि ४२ शिपाई अशा ११५ जणांचे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने जाहिरातीद्वारे निविदाही मागविण्यात आल्या. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कंत्राट पद्धतीने मनुष्यबळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, या विषयावर आक्षेप घेण्यात आला, परंतु याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष करून, नियोजित कार्यक्रमानुसार २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता निविदा उघडण्याचे ठरविले, परंतु निविदा उघडण्यापूर्वीच राज्यपाल कार्यालयातून कंत्राटी पद्धतीने पदभरती निविदा उघडू नये, असे आदेश देण्यात आले. मात्र, कुलगुरूंनी असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)