अमरावतीच्या 'सिंघम' पालकमंत्र्यांनी टाकली मटक्याच्या अड्यावर धाड
By admin | Published: October 12, 2016 01:27 PM2016-10-12T13:27:05+5:302016-10-12T15:23:08+5:30
अमरावतीचे ' सिंघम' पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी बछराज प्लॉट येथे जाऊन मटक्याच्या अड्यावर धाड टाकून पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले
अमरावती शहरात फोफावलेल्या अवैध व्यवसायाविषयी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म, उद्योग आणि पर्यावरण राज्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना अमरावती शहरात जुगाराचे अड्डे सर्रास सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे मंगळवारी सायंकाळी नामदार प्रवीण पोटे यांनी रवी गुप्ता याच्या जुगार अड्ड्यावर स्वत: छापा मारला.
दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनीच पोलिसांप्रमाणे धाड टाकल्यामुळे क्षणभर आरोपींना काही कळेनासेच झाले. कुठल्याही पोलीस लावाजम्याशिवाय जुगार अड्ड्यात धडकलेले व्यक्ती हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे लक्षात आल्यावर सर्वच जण कमालीचे घाबरले. जागा मिळेल तिकडे ते सैरभैर पळू लागले. मात्र, मजबूत इराद्याने जुगार अड्ड्यात दाखल झालेल्या पालकमंत्र्यांनी स्वत: आरोपींचा पाठलाग केला. एखाद्या चित्रपटात शोभावे याप्रमाणे त्यांनी आरोपींच्या कॉलर पकडून त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्र्यांनी जुगाऱ्यांना पकडल्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना तत्काळ घटनास्थळी बोलविण्यात आले. संबंधित शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनाही पाचारण करण्यात आले. संतप्त पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त, ठाणेदार आणि इतर जबाबदर पोलीस अधिकाऱ्यांची तेथेच कानउघाडणी केली.
पोलिसांनी प्रभाकर आकाराम शिरभाते (५१, आदर्शनगर), गजानन बाबाराव शिरभाते (४०,रा. मुर्तीजापूर), बाबू नागोराव सुरकार (३७,रा. विलासनगर) आणि आशिष शंकर निमजे (२९, रा. नागपूर) या चार आरोपींना अटक केली. जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार रवी गुप्ता हा पसार होण्यात यशस्वी झाला. त्याच्या अटकेचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सट्टापट्टी, जुगाराचे अन्य साहित्य व ८ हजार ७८० रुपयांची रोख असा एकूण ११ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुध्द कलम १२ महाराष्ट्र जुगार अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. पालकमंत्र्यांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून सिंघम पालकमंत्र्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल अमरावतीकर त्यांचे भरभरुन कौतुक करीत आहेत.
कारवाई व्हायरल
पालकमंत्र्यांनी केलेल्या धाडसी कारवाईची छायाचित्रे तरुणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जशी लोकप्रिय झाली तशीच ती इतर मध्यमवर्गीय सामान्यांच्याही चर्चेचा विषय ठरली आहेत. फेसबुकवरही ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात ‘लाईक’ केली जात आहेत.
शहरात सुरु असलेले जुगार अड्डे गरीबांच्या लुटीचे केंद्र ठरले आहे. गुन्हेगारीला त्यामुळे बळ मिळते. पालकमंत्री या नात्याने या बाबी रोखणे हे माझे कर्तव्यच आहे. मी ते बजावले.
- प्रवीण पोटे पाटील, पालकमंत्री, अमरावती
शहरात पोलीस ठाण्यांच्या हद्द निश्चित आहेत. गुन्हेगारांना बळ देणे आणि वरिष्ठांपासून माहिती लपवून ठेवणे, या ठाणेदारांच्या कृत्यांमुळे पोलीस विभागाला मान खाली घालावी लागली. दोषी ठाणेदारांविरुद्ध लवकरच कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती