अमृत योजनेतून उद्यानांचा होणार विकास

By admin | Published: June 5, 2017 12:37 AM2017-06-05T00:37:33+5:302017-06-05T00:37:33+5:30

अत्यंत सुनियोजितपणे विकसित झालेले शहर असा लौकिक पिंपरी-चिंचवड शहराचा आहे.

Amrit scheme will bring gardens to development | अमृत योजनेतून उद्यानांचा होणार विकास

अमृत योजनेतून उद्यानांचा होणार विकास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अत्यंत सुनियोजितपणे विकसित झालेले शहर असा लौकिक पिंपरी-चिंचवड शहराचा आहे. प्रशस्त रस्ते, भव्य क्रीडांगणे, डोळे दिपवणारे उड्डाणपूल आणि कल्पक अशी उद्याने ही या शहराची ओळख होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून उद्यानांचा विकास केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत सहभाग झाला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मूलभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. तर अमृत योजनेतून केंद्राकडून मिळणारा निधी विविध प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महापालिका प्राधिकरण, एमआयडीसी परिसरात ४७ उद्यानांची निर्मिती केली आहे. तर सहा उद्याने प्रस्तावित आहेत. यापूर्वी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू, नागरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविण्यात आल्या. निगडीतील भक्ती-शक्ती, भोसरीतील सहल केंद्र, पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यान, संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी, सर्पोद्यान, बर्ड व्हॅली अशी उद्याने विकसित केली आहेत. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही आकुर्डी, निगडी, इंद्रायणीनगर, रावेत प्राधिकरणात उद्याने विकसित करून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत योजनेत झाला आहे. त्यामुळे उद्यान विकासासाठी आता अमृत योजनेतून मिळणारा निधी नवीन योजनांसाठी वापरला जाणार आहे.
गेल्या वर्षभरात जुनी सांगवी मधुबन सोसायटीतील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान पूर्ण झाले आहे. ३.३५ कोटी खर्च करून हे उद्यान उभारले आहे, तर संत तुकारामनगर पिंपरी परिसरात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम या उद्यानाची निर्मिती केली आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच काळेवाडीत जोतिबा उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे ३.३५ कोटी रुपये खर्च केला आहे. तसेच पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानात शिल्पविषयक आणि स्थापत्यविषयक कामांनाही मंजुरी मिळाली आहे. तसेच पवना नदीतीरावरील मोरया गोसावी मंदिराशेजारील परिसरात उद्यान विकसित केले असून त्याची सुरुवातही काही महिन्यांपूर्वी केली आहे.
चिंचवड येथील पवना नदी तिरावर जिजाऊ पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. शहरातील पहिली ओपन जीम या ठिकाणी उभारली आहे. महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने दुर्मिळ प्राण्यांच्या मूर्ती या ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. स्केटींग रिंग तसेच जॉगिंग ट्रॅकही उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर महासाधू मोरया गोसावी यांचे जीवनदर्शन घडविणारी शिल्पसृष्टी उभारली आहे.
>उद्यानांबरोबरच क्रीडांगणावर भर
अमृत योजनेंतर्गत ‘अ’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्रभाग १६ मध्ये उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या १.०३ कोटी खर्चास मान्यता मिळाली असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर चिखली, तळवडे, दिघी या परिसरातही उद्याने उभारण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उद्यानांचा विकास केला जातो. केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमृत योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. या योजनेंतर्गत उद्यान विकासाची काही कामे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका यांच्या निधीतून ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंगर्तत पहिले उद्यान आकुर्डी परिसरात होणार आहे. त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अमृत योजनेतील पहिले उद्यान लवकरच साकारण्यात येईल.
- संजय कांबळे,
कार्यकारी अभियंता स्थापत्य

Web Title: Amrit scheme will bring gardens to development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.