अमृता फडणवीस यांचा ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ने गौरव!
By admin | Published: May 5, 2017 04:04 AM2017-05-05T04:04:40+5:302017-05-05T04:04:40+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत करण गुप्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात फाउंडेशनचे संस्थापक आणि आयई बिझिनेस स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक करण गुप्ता यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यवसायाने बँकर असलेल्या अमृता फडणवीस अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असतात. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून, केवळ वलयांकित आयुष्यात गुंतून न पडता, त्यांनी व्यावसायिक, सामाजिक आणि संगीत क्षेत्रातही घोडदौड सुरू ठेवली आहे. या त्यांच्या धडाडीतून अन्य महिलांना प्रेरणा मिळावी, हाच त्यांना पुरस्कार देण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्त्री सक्षमीकरणासाठी देदीप्यमान उदाहरण ठरलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनाही या वेळी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अॅसिड हल्ल्यापीडित लक्ष्मी अगरवाल, तृतीयपंथींसाठी कार्य करणाऱ्या गौरी सावंत, फराह खान अली, क्रिशिका लुल्ला, मालिनी अगरवाल आणि शाहीन मिस्त्री अशी अन्य पुरस्कारप्राप्त महिलांची नावे आहेत. (प्रतिनिधी)