"अमृता फडणवीस अधिक लाईमलाईटमध्ये, त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:12 PM2021-12-22T14:12:43+5:302021-12-22T14:17:51+5:30
रश्मी वहिनींना चार्ज देऊन मुख्यमंत्री करता येऊ शकते. त्या मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणाले होते पाटील.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा मुलावरही बहुतेक विश्वास नसावा, अशी फिरकी चंद्रकांत पाटील यांनी घेतली. तसचं रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते, असंही ते म्हणाले. आता यावरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला टोला लगावला आहे.
"अमृता फडणवीस या अधिक लाईमलाईटमध्ये असतात, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का हे पहिले विचारलं पाहिजे. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. चंद्रकांत पाटील हे मोठे नेते आहेत, पण कधीकधी त्यांची कीव करावीशी वाटते. आमच्यासारख्यांनी त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात तरीही त्यांचं नाव घेतलं जातं. एकीकडे स्त्रियांचा आदर करतो असं सांगतात, पण दुसरीकडे हनन करायचं," असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.
काय म्हणाले होते पाटील?
"मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणं स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर ते सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.