अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजं; पुरुषोत्तम खेडेकरांचा महिलांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:19 PM2023-12-25T12:19:43+5:302023-12-25T12:25:09+5:30
तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे असं खेडेकर यांनी म्हटलं.
बुलढाणा - समाज हा घडत असतो, ते घडण्याचं केंद्र कुटुंब असते. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून समाज तयार होतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही. बालपणापासून मुलगा-मुलगी समानतेने वागवले जाणार नाही. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांमध्ये त्यांची आई फरक करते त्या मुलीनं तक्रार कुणाकडे करायची? दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही अमृता फडणवीसांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, हुंडा बाप की माय कोण द्यायला सांगते, तर माय...जास्तीत जास्त बाबी महिलांनी स्वीकारल्या आणि बदलल्या तरच शक्य आहे. बदल हा महिलांच्या रक्तात आहे. किचनमध्ये दिवसाला बदल करत असतात. एवढे बदल वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात करत असता, मग तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बदलत नाही? साधी टिकली रोज वेगवेगळी बदलली जाते. नवरा बदलू शकत नाही ही तुमची अडसर आहे, मला ते मान्य आहे. नाहीतर तोदेखील बदलला असता.महिलांनी ठरवलं तर समाजात बदल शक्य आहे असं त्यांनी म्हटलं. बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीत संमेलनाच्या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
तसेच ज्या ब्राह्मण समाजातील महिलांनी अन्याय, अत्याचार झुगारून दिले.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानली पाहिजे. विलासराव-शरद पवारांची पत्नी सोडली तर राजकारणात अमृता फडणवीस आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस यांना केस कापायला जायचं असेल तर त्यांना विचारून जातात. तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. हा प्रत्यक्षात आणावा. स्वत:तयार व्हा असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना सांगितले.
दरम्यान, जग बदलायचं तेव्हा बदलेल, बदलाची सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाला विश्वासात घेऊन करा. आजही आम्ही बहुसंख्येने असलो तरी विषमतावादी, शौषणवादी, वर्ण वर्चस्ववादी वैदिक साहित्याचे हमाल म्हणूनच ओझे वाहत आहोत. धर्माची दारू, जातीची नशा, परधर्माचा टोकाचा द्वेष आपल्या उंबरठ्याजवळ आलाय अशा वेळी साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी आपली लेखणी झिजवावी असं प्रतिपादनही खेडेकर यांनी संमेलनात केले.